पुणे: खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात मोक्का कारवाई करण्यात आल्यानंतर फरार असलेल्या दुसऱ्या सराईत गुन्हेगाराला पकडण्यात लोणी काळभोरपोलिसांना यश आले आहे.
शुभम भाऊसो बरकडे (वय २३, रा. लोणी काळभोर) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. भेकराईनगर येथील एटीएम सेंटरवर पैसे काढण्यासाठी रोहन इंगळे गेले होते. यावेळी शुभम कामठे, शुभम बरकडे व इतरांनी एटीएम सेंटरमध्ये घुसून इंगळे यांना काेयत्याचा धाक दाखवून बाहेर आणले. यावेळी जमलेल्या लोकांना कोयते दाखवून कोणालाही जिवंत सोडणार नाही, असे धमकाविले. त्यामुळे परिसरातील नागरिक पळून गेले. त्यानंतर त्यांनी इंगळे याला कोयत्याने मारहाण करुन जबर जखमी केले होते. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी सर्वांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यानंतर शुभम कामठे व शुभम बरकडे गेले ३ महिने फरार होते. हडपसर पोलिसांनी त्यांच्यावर मोक्का कारवाईचा प्रस्ताव पाठविला होता. तो पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मंजूर केला होता.
लोणी काळभोर पोलिसांनी २३ मे रोजी शुभम कामठे याला पिस्तुलासह पकडले होते. त्यानंतर बरकडे याचा शोध घेत असताना २६ मे रोजी सकाळी शुभम हा कोळपेवस्ती येथील राहत्या घराच्या परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस नाईक अमित साळुंके यांना मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर आणि त्यांच्या पथकाने सापळा रचला. शुभम तेथे येताच पोलिसांनी त्याला पकडले. शुभम बरकडे याच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात यापूर्वी खुनाचा प्रयत्न केल्याचे २ गुन्हे दाखल आहेत. पुढील कारवाईसाठी त्याला हडपसर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.