पुणे (धायरी) : पुण्यातील नवले ब्रीजजवळ पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. मुंबईच्या दिशेने निघालेल्या भरधाव ट्रकने सात ते आठ वाहनांना जोरदार धडक दिली आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात काहीजण किरकोळ जखमी झाले असून वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज बाह्य वळण महामार्गावर एका ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर असणाऱ्या वाहनांना धडक दिली. ह्या विचित्र अपघातात एकूण नऊ वाहनांचे नुकसान झाले असून दोनजण जखमी झाले आहेत.हि घटना बुधवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास नवले पुलाजवळ घडली. ह्याबाबत ट्रकचालकास भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
कात्रजकडून नवले पुलाच्या दिशेने निघालेला माल ट्रक ( क्रमांक: एमएच.१२ एलटी. ४७५५) दुपारी नवले पुलाजवळील बाबजी पेट्रोल पंपाजवळ आला असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पुढे असणाऱ्या ७ चारचाकी वाहनांना व एका रिक्षाला तसेच एका दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये रिक्षाचालक व एक महिला जखमी झाली आहे. जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने चारचाकी वाहनांमध्ये असणाऱ्या प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही. मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या अपघातानंतर काहीवेळ मुंबई -बेंगलोर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यानंतर वाहतूक पोलिसांच्या प्रयत्नाने ती सुरळीत सुरु झाली होती.
मुंबई - बेंगलोर महामार्गावरील नवले ब्रिज जवळ सातत्याने अपघाताच्या घटना घडत असतात. तसेच अनेकांना निष्कारण आपला जीव देखील गमवावा लागला आहे. परंतू, तरीदेखील राष्ट्रीय महामार्ग प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. ऑक्टोबर व नोव्हेंबर देखील महिन्यात अशाच प्रकारे अपघात झाले होते.
लहान मुले बालंबाल बचावली....
क्रिकेटचा सामना असल्याने लहान मुलांचा संघ क्रिकेट खेळण्यासाठी बालेवाडी स्टेडियम येथे चार चाकी वाहनाने निघाली होती. या अपघातात त्यांच्या वाहनांना जोरदार धडक बसली. मात्र सुदैवाने ह्यात कोणीही जखमी झाले नाही.
यामुळे घडतात नवले ब्रिजजवळ अपघात... नवीन कात्रज बोगदा ते वडगांव पुल दरम्यान तीव्र उतार असल्याने माल वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांचे ब्रेक लागणे अशक्य होते. अशावेळी वाहनांची गती कमी करण्यासाठी महामार्गावर पांढरे पट्टे करणे गरजेचे आहे.