पुणे : ‘डीआरडीओ’चे संचालक डाॅ. प्रदीप कुरुलकर यांना पाकिस्तानातून आलेल्या ई-मेलचा सखोल तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे. कुरुलकरांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेरांना संवेदनशील माहिती तसेच छायाचित्रे ई-मेलद्वारे पाठवल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. राज्य दहशतवादविरोधी विभागाच्या (एटीएस) कोठडीत असलेल्या कुरुलकरांची चौकशी सुरू आहे. कुरुलकरांची सखोल चौकशी करायची असल्याने त्यांना १५ मेपर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामधून इंडियन एअरफोर्सचा आणखी एक अधिकारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याची धक्कादायक माहिती कुरुलकरांच्या चौकशीतून समोर आली आहे.
कुरुलकर यांच्या संपर्कात असलेल्या महिलेने बेंगळुरु येथे हवाई दलात कार्यरत असलेल्या एका मराठी अधिकाऱ्यालाही संपर्क साधल्याचे समोर आले आहे. त्या महिलेने संबंधित अधिकाऱ्याशी फेसबुक आणि व्हॉट्सअपवर संवाद झाला. त्या अधिकाऱ्याचा देखील या प्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने जबाब नोंदवला आहे. तसेच कुरुलकर यांच्या पोलीस कोठडीत एक दिवसाची वाढ करण्यात आली आहे.
कुरुलकर यांना पाकिस्तानातून काही ई-मेल पाठवण्यात आले आहेत. या ई-मेलला प्रतिसाददेखील दिलेला आहे. पाकिस्तानातील आयपी ॲड्रेसवर मेल केल्याची माहिती गुगलने दिलेल्या अहवालातून उघड झाली आहे. कुरुलकरांनी देशाच्या सुरक्षेला बाधा आणणारे काही छायाचित्रे पाठवल्याचा संशयदेखील तपास यंत्रणेला आहे. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या लॅपटाॅप आणि मोबाइल संचाचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले असून, याबाबतचा अहवाल एटीएसला मिळाला आहे. २०२२ मध्ये कुरुलकरांनी सहा देशांना भेटी दिल्या आहेत. शासकीय पारपत्राद्वारे कुरुलकरांनी परदेशात जाऊन पाकिस्तानी हेरांच्या भेटी घेतल्याचा संशय एटीएसला आहे. परदेशात कोणाची भेट घेतली याअनुषंगाने चौकशी करण्यात येत आहे.