पुणे : टोळीप्रमुख गुंड नीलेश घायवळ आणि त्याच्या साथीदारावर पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) नुसार कारवाई करून त्याला अटक केली आहे. मंगळवारी सकाळी येरवडा कारागृहातून त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
नीलेश बन्सीलाल घायवळ (वय ४४), संतोष आनंद धुमाळ (वय ३८) व मुसाब ऊर्फ मुसा इलाही शेख (वय २९) अशी अटक केलेल्याचे नावे आहेत. तर कुणाल, कंधारे, अक्षय गोगावले, विपुल माझीरे व इतर तिघांवर मोक्कानुसार कारवाई केली असून ते फरार आहेत.गेल्या आठवड्यात ग्रामीण पोलिसांनी स्थानबद्धतेची कारवाई करत एक वर्षासाठी घायवळची रवानगी येरवडा कारागृहात केली होती. भिगवण पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घायवळला त्याचे मूळ गाव असलेल्या जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथून अटक केली होती.
कोथरूड येथील गुन्ह्यात घायवळ याच्यावर मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील फिर्यादी यांचे डावी भुसारी कॉलनी येथे गॅरेज आहे. गेल्या वर्षी घायवळचा हस्तक संतोष धुमाळ व इतरांनी फिर्यादींना शस्त्राचा धाक दाखवून भाऊच्या रॅलीसाठी गाडी पाहिजे म्हणून कार जबरदस्तीने घेऊन गेले होते. याबाबत फिर्यादींनी खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार दिली होती. त्या तक्रारीची चौकशी केल्यानंतर केली. त्यानंतर याप्रकरणी घायवळ टोळीचा प्रमुख हस्तक संतोष धुमाळ आणि मुसा याला अटक केली होती.या गुन्ह्याचा तपास खंडणीविरोधी पथकाकडून सुरू होता. यावेळी या गुन्ह्यात गुंड नीलेश घायवळचा सहभाग आढळून आला. घायवळ याच्यावर पूर्वीचे खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी अशा प्रकारचे १४ गुन्हे दाखल आहे. घायवळ हा टोळी करून गुन्हे करत असल्याने त्याच्या विरोधात मोक्का कारवाईचा प्रस्ताव खंडणी विरोधी पथकाने पाठविला. त्यानुसार गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे यांनी घायवळ याच्यावर मोक्काच्या कारवाईला मंजुरी दिली.
घायवळला पुणे ग्रामीण पोलिसांनी एका वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले आहे. त्यामुळे या गुन्ह्यात त्याला येरवडा कारागृहातून वर्ग करून घेतले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त लक्ष्मण बोराटे, उपनिरीक्षक विजय झंजाड, कर्मचारी सचिन अहिवळे, सुरेंद्र जगदाळे, प्रदीप शितोळे, विनोद साळुंके, भूषण शेलार, प्रदीप गाडे यांच्या पथकाने केली.-------------------------------