लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : एकाने घटस्फोट दिल्यानंतर दुसर्या त्याच्या पत्नीशी लग्न केल्याच्या रागातून दोन गटात तुफान हाणामारी झाली. यात कोयते, काठ्या, दगडाने परस्परांवर वार केल्याने त्यात दोन्ही गटातील ५ जण जबर जखमी झाले आहेत. याप्रकरणी खडकी पोलिसांनी ६ जणांना अटक करुन २२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी हैदर शफा इराणी (वय २४, रा. विष्णुकृपा तरुण मंडळ, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अल अब्बास शौकत इराणी (वय २६) शौकत खाननवाज इराणी (वय ५५), बिलाल खाननवाज इराणी (वय ३५, सर्व रा. इराणी वस्ती, शिवाजीनगर) यांना अटक करुन इतर ९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे नातेवाईक आहेत. अली अब्बास शौकत इराणी याने त्याच्या पत्नीला सोडून दिले आहे. फिर्यादी याने तिच्यासमवेत लग्न केल्याने आरोपीच्या मनात राग होता. फिर्यादी, त्यांची मावशी मंजु इराणी व मामाचा मुलगा अब्बास इराणी हे शुक्रवारी दुपारी अलीबाबा यांच्या घरासमोर एकत्र असताना आरोपी कोयते, काठ्या, दगड घेऊन आले. त्यांनी फिर्यादी व मंजु इराणी यांच्या डोक्यात कोयत्याने मारले. अब्बास इराणी त्याच्या डोक्यात कोयता व काठीने मारहाण केली. दगडांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
त्याविरोधात बिलाल इराणी (वय ३६, रा. इराणी वस्ती) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अब्बास अलीबाबा इराणी (वय २०), हैदर शफा इराणी (वय २३) , अलीबाबा बाबु इराणी (वय ४६, सर्व रा. इराणी वस्ती) यांना अटक केली असून इतर ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींनी फिर्यादी यांच्या डोक्यावर, पाठीवर, तसेच छातीवर मारहाण करुन जखमी केले. तसेच अली अकबर शौकत इराणी यांच्या पायावर चाकूने वार करुन कपाळावर व तोंडावर लाकडी दांडक्याने मारहाण करुन जखमी केले.