पुणे : सिंहगड रोड परिसरात दहशत माजविणार्या बंटी पवार टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले.
महेश उर्फ बंटी प्रकाश पवार (वय ३६), शुभम बबन वाघमारे (वय २६), प्रवीण बाळासाहेब ढाकणे (वय १९, तिघे रा. वडगाव बुद्रुक) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
बंटी पवार टोळीविरोधात खुन, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दहशत माजविणे, अपहरण, बलात्कार असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत. २०१५ मध्य बंटी पवार आणि त्यांच्या साथीदारांवर मोक्का कारवाई केली होती. त्यानंतर तो जुलै २०१९ मध्ये जामीन मिळवून बाहेर आल. होता. त्यानंतर त्याने पुन्हा दोन खुनाचे प्रयत्न केले व पसार झाला. पोलिसांनी ऑगस्ट २०१९ मध्ये त्याला अटक करुन येरवडा कारागृहात रवानगी केली. परंतु, कोव्हीड १९ च्या प्रार्दुभावाचा गैरफायदा घेत तो जामीनावर पुन्हा बाहेर आला. त्यानंतर २० जून २१ रोजी बंटी पवार व साथीदार शुभम वाघमारे यांना ५ लाख रुपयांचा गांजासह अटक करण्यात आली. तपासात पवारचा साथीदार ढाकणे याच्याकडून अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.
बंटी पवार आणि साथीदारांविरोधात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे यांनी परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्याकडे सादर केला. अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी या प्रस्तावास नुकतीच मंजूर दिली. पोलीस निरीक्षक घेवारे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले, कुलदीप संकपाळ, प्रमोद कळमकर, मोहन भुरूक आदींनी ही कारवाई केली. पोलीस आयुक्तांच्या आदेशाने आतापर्यंत शहरातील ३० गुंड टोळ्यांविरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे.