पुणे : कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या ४ काळवीटांच्या मृत्यूस महापालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप करीत, बुधवारी मनसेने सर्वसाधारण सभेत काळवीटाची प्रेतयात्रा आणून निषेध केला़
सर्वसाधारण सभा सुरू होण्यापूर्वीच मनसे गटनेते वसंत मोरे, नगरसेवक साईनाथ बाबर यांनी काळवीटाची प्रेतयात्रा सभागृहात आणून महापौराच्या डायससमोरील रिकाम्या जागेत ठेवली़ शहरातील उद्यानांप्रमाणेच प्रशासनाचे प्राणीसंग्रहालयाकडेही दुर्लक्ष झाले असून यामुळे उद्याने मरणासन्न अवस्थेत आली आहेत असा आरोप करीत, भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मुत्यूमुखी पडलेल्या काळवीट मृत्यूप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी लावून धरली़
या गदारोळात सत्ताधारी पक्षाकडून सभा तहकुबीची घाई चालू होती़ मात्र मनसेच्या या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका आणि विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल, नगरसेवक बाबुराव चांदेरे, स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप आदींनी साथ देत प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नसल्याच्या निषेध केला़
दरम्यान, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या सर्वांची बाजू ऐकून, येत्या दोन दिवसात काळवीट मृत्यूप्रकरणी दोषींवर कारवाई करावी व सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले़ तसेच कोरोनामुळे बंद केलेली उद्याने टप्प्या-टप्प्याने खुली करण्यात येतील व त्यांना पुन्हा पूर्वीप्रमाणे चांगले स्वरूप व सुस्थिती प्राप्त करून दिले जाईल असे आश्वासन दिले़
यावेळी मोहोळ यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना कात्रज प्राणी संग्रहालयाच्या सीमाभिंती संदर्भात निविदा प्रक्रियेनंतर कामाला तातडीने सुरूवात करण्याचे निर्देश दिले. या गदारोळात मुख्य सभा तहकूब करण्यात आली.
--
फोटो मेल केला आहे़