पुणे : पुरुषाेत्तम करंडक म्हंटलं की पुण्यातील नाट्यमंडळांमधील तरुणाई जाेमाने कामाला लागते. अापल्याच महाविद्यालयाला करंडक कसा मिळेल यासाठी प्रत्येक संघ तयारी करत असताे. सध्या सर्व महाविद्यालयांमध्ये पुरुषाेत्तमची रणधुमाळी सुरु अाहे. नाटकासाठी वाट्टेल ते करायला ही तरुणाई तयार झाली अाहे.
बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या पुरुषाेत्तमच्या संघाने अापलं नाटक कसं उत्तम हाेईल यासाठी जाेरदार तयारी सुरु केली अाहे. काही दिवसांपूर्वी या संघाचा दिग्दर्शक शुभम गिजे याने कलाकारांना एक टास्क दिला. यात सर्वांना अापल्याला येत असलेली कला रस्त्यावर जाऊन सादर करण्यास सांगितले. यातील सर्वांनी दाेघां-तिघांचे ग्रुप करुन विविध रस्ते गाठले. काेणी इंग्रजी कवितांवर कथ्थक सादर केले, कुणी रस्त्यावरच गझल चे कार्यक्रम केले. तर काेणी थेट पथनाट्यातून विविध मुद्दे मांडले. दाेघींनी तर थेट रस्त्यावरच हेअरस्टाईल करुन दिली. याला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला. अनेकांनी तर या विद्यार्थ्यांना त्यांच्या सादरीकरणासाठी इनाम म्हणून पैसेही दिले. या टास्कचा उद्देश हा अापली कला सादर करताना काेणालाही कसलिही लाज वाटू नये, प्रेक्षकांना सामाेरे जाताना मनात असलेली भीती निघून जावी असा असल्याचे शुभम सांगताे. संघातील सर्वांनी हा टास्क मनापासून केला. या टास्कनंतर अापण जर रस्त्यावर अापली कला सादर करु शकताे. तर रंगमंचावर अापण उत्तमच सादरीकरण करु शकताे, असा विश्वास या कलाकारांमध्ये तयार झाला.
पुरुषाेत्तमचं नाटक भारी व्हावं यासाठी ही मुलं दिवसातून 10 ते 12 तास तालीम करत अाहेत. अभिनयात, सादरीकरणात अाणि कथेत कुठल्याही उणिवा राहू नयेत यासाठी ही पाेरं मेहनत घेत अाहेत. नाटकाच्या प्रत्येक अंगाचा विचार यांच्याकडून करण्यात येत अाहे. नाटकातील पात्र ही खऱ्या अायुष्यात कशी वागतात हे पाहण्यासाठी ही मुलं रस्तावरील नाटकातील पात्राशी सुसंगत व्यक्तींचे निरीक्षण करतात. त्यांचे फाेटाे काढतात. त्यांच्याशी बाेलून अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत अाहेत. जेणेकरुन अापलं नाटक प्युअर वाटेल. या मुलांनी नाटकासाठी जी काही माहिती लागेल हे शाेधण्यासाठी अापल्यातूनच एक संशाेधक टीम सुद्धा तयार केली अाहे. ही टीम नाटकाच्या कथेसाठी लागणारे साहित्य मिळविण्याचे काम करते. त्यामुळे एकीकडे नाटकाकडे तरुणाची पाठ हाेतेय अशी अाेरड हाेत असताना दुसरीकडे पुण्यात मात्र तरुण नाटकासाठी वाट्टेल ते करायला तयार अाहेत.