पुणे : पत्नीच्या नावावर खरेदी केलेल्या जागेची नोंद सात-बारा उताऱ्यावर घेण्यासाठी तक्रारदाराला ५० हजारांची लाच मागणाऱ्या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. भाऊसाहेब भिकाजी गिरी (वय ५६, रा. साई बालाजी सोसायटी, आव्हाळवाडी, वाघोली) आणि संजय मारुती लगड (वय ५३, साईनगर, लोहगाव) त्यांची नावे आहेत.
तक्रारदार यांनी पत्नीच्या नावे जागा खरेदी केली आहे. त्याची नोंद सात-बारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी तक्रारदार यांनी वाघोली तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. गिरी व लगड हे तलाठी कार्यालयात मदतनीस म्हणून खासगी काम करतात. तलाठ्यांकडून काम करून घेण्यासाठी त्यांच्याकडे लाच मागण्यात आली. गिरी याने तलाठी पटांगे यांच्यासाठी ४५ हजार व त्यांच्या स्वत:साठी ५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली. त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ११ व १२ मे रोजी पडताळणी केली.
त्यात संजय लगड याने लाच मागण्यासाठी साहाय्य केल्याचे निष्पन्न झाले. परंतु, प्रत्यक्ष लाच सापळा कारवाई होऊ शकली नाही. मात्र, लाच मागितली असल्याने लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली. पोलिस उपअधीक्षक माधुरी भोसले तपास करीत आहेत.