कुतूहलापोटी केल्या जाताहेत अँटिबॉडी टेस्ट : कोरोनाची लागण किंवा लसीकरणाला तो केवळ प्रतिसाद????
डमी star 942
पुणे : लसीकरण झाल्यानंतर अँटिबॉडी तपासणी करणाऱ्यांबद्दल अनेक नागरिक उत्सुक असल्याचे दिसत आहे. कोरोनाची लागण होऊन गेल्यावर शरीरात कधीपर्यंत अँटिबॉडी राहतात किंवा लसीकरण झाल्यावर किती दिवसांनी त्या विकसित होतात, हे जाणून घेण्यासाठी तपासणी करण्याकडे कल आहे. मात्र, अँटिबॉडी म्हणजे संपूर्ण प्रतिकारशक्ती नव्हे, असे वैद्यकतज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे अँटिबॉडी टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणून कोणतेही नियम न पाळता बिनधास्त वावरणे चुकीचे आहे. डॉक्टरांकडून टेस्ट करून घेण्याचा सल्ला शक्यतो दिला जात नाही.
शरीरातील रक्ताचा नमुना घेऊन विशिष्ट मशिनच्या अथवा किटच्या साहायाने अँटिबॉडीचे प्रमाण मोजले जाते. या चाचण्यांचे परिणाम आपण 'संरक्षित आहोत' किंवा 'संरक्षित नाही' हे ठरवण्यासाठी पुरेशी माहिती देऊ शकत नाहीत. कोविडची लागण किंवा लसीकरणाला शरीराच्या प्रतिसादाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे प्रतिपिंडे. अँटिबॉडी चाचण्यांमधून रोगप्रतिकारकशक्तीचा अचूक अंदाज बांधता येत नाही.
बरेचदा अँटिबॉडी उपस्थित नसल्या तरी टी-सेल अथवा मेमरी सेलच्या माध्यमातून शरीराला संरक्षण मिळत असते.
----------
अँटिबॉडी चाचणी गरजेची नसते. कारण, त्यातून केवळ रोगप्रतिकारशक्तीचा एक भाग मोजला जातो. बहुतांश प्रयोगशाळांमध्ये एकूण अँटिबॉडीची टेस्ट केली जाते. रोगप्रतिकारकशक्तीमध्ये न्यूट्रलायझिंग अँटिबॉडी जास्त महत्त्वाच्या असतात. एखाद्याच्या शरीरात अँटिबॉडीची पातळी कमी असली तरी पुरेशा टी पेशी असू शकतात. संक्रमणास लढण्यासाठी ते महत्त्वपूर्ण साधन आहे. म्हणून डॉक्टरांकडून तपासणीची सरसकट शिफारस केली जात नाही. एफडीएच्या म्हणण्यानुसार, लोकांनी लसीची परिणामकारकता शोधण्यासाठी अँटिबॉडी चाचण्यांवर अवलंबून राहू नये.
- डॉ. सुहृद सरदेसाई, जनरल फिजिशियन
-------
लागण होऊन गेल्यानंतर आणि लसीकरण झाल्यानंतर अँटिबॉडी टेस्टसाठी येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पूर्वीच्या तुलनेत हे प्रमाण २० टक्क्यांनी जास्त आहे. अबॅट मशिनच्या साहाय्याने तपासणी केली जाते. १.४ पेक्षा प्रमाण कमी असल्यास टेस्ट निगेटिव्ह आणि १.४ पेक्षा जास्त असल्यास पॉझिटिव्ह मानली जाते. सौम्य लागण होऊन गेली असेल तर प्रमाण ५-६ च्या दरम्यान असते. तीव्र लागण होऊन गेली असल्यास हे प्रमाण २०-४० इतकेही असू शकते. लागण होऊन गेल्यावर एक-दोन महिन्यात टेस्ट केल्यास अँटिबॉडीचे प्रमाण जास्त असते. तीन-चार महिन्यांनी टेस्ट केल्यास प्रमाण कमी होऊ शकते.
- डॉ. संजय इंगळे, पॅथॉलॉजिस्ट
------
अँटिबॉडी टेस्टसाठी फार मोठ्या प्रमाणात सध्या विचारणा होताना दिसत नाही. एखाद्या व्यक्तीला परदेशात जाताना सध्या तरी लसीकरणाचे प्रमाणपत्र गरजेचे आहे. अँटिबॉडी प्रमाण मोजण्यासाठी रक्त तपासणी बंधनकारक नाही.
- डॉ. शार्दूल सहाणे, पॅथॉलॉजिस्ट
----
जिल्ह्यात झालेले लसीकरण
पहिला डोस - ५५,२२.०८३
दोन्ही डोस - १२,७६,१७९