पुणे : कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत असतानाच, एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर ‘अँटिबॉडी कॉकटेल’ उपचारपद्धती प्रभावी ठरत आहे. पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय व संशोधन केंद्रामध्ये दोन कोरोनाबाधित रुग्णांना ‘अँटिबॉडी कॉकटेल’ उपचार देऊन पूर्णपणे बरे केले आहे. मोनोक्लोनल अँटिबॉडीजच्या वापरामुळे हा प्रयोग यशस्वी झाला आहे.
उपचारांमध्ये वापरण्यात येणारे औषध मोनोक्लोनल अँटिबॉडीज नावाच्या अत्यंत अत्याधुनिक औषधांच्या समूहांपैकी एक आहे. या उपचार पद्धतीसाठी दोन रुग्ण निवडण्यात आले होते. यातील एक रुग्ण हा अतिजोखीम गटातील होता तर दुसऱ्या रुग्णामध्ये ताप, थकवा आणि इतर सौम्य लक्षणे दिसून आली होती. त्यांची क्लिनिकल ट्रायल्ससाठी निवड करण्यात आली. या दोन्ही रुग्णांच्या रक्त वाहिनीमध्ये कासिरिव्हिमॅब आणि इंडेव्हिमॅब ही दोन इंजेक्शन्स सोडण्यात आली. ही औषधे शरीरात गेल्यावर विषाणूंना विरोध करतात. त्यामुळे विषाणूंना दुसऱ्या पेशीत प्रवेश करता येत नाही. २४ तासांच्या आत या रुग्णांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून आले.
उपचार पद्धतीद्वारे दोन्ही रुग्णांच्या शरीरातून कोरोनाची लक्षणे गायब झाली. शिवाय उपचार पद्धतीमुळे त्यांना इतर कोणताही त्रास किंवा दुष्परिणाम झाले नाहीत. त्यांना १४ दिवस देखरेखीखाली ठेवण्यात आले. ‘अँटिबॉडी कॉकटेल” उपचार पद्धतीद्वारे अतिजोखीम गटातील रुग्ण सात दिवसांच्या आत बरे होतात, अशी माहिती रुग्णालयाच्या श्वसन विकार विभागाचे प्रमुख डॉ. (नि. ब्रिगेडिअर) एम. एस. बरथवाल यांनी दिली.
कोरोनाबाधित रुग्णांसाठी अँटिबॉडी कॉकटेल उपचारपद्धती प्रभावी असल्याचे सिद्ध झाले असून यामुळे एक आशादायी चित्र समोर आले आहे. यशस्वी उपचार प्रक्रियेमध्ये सहभागी टीमचा मला खूप अभिमान आहे, असे मत डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाचे विश्वस्त डॉ. यशराज पाटील यांनी व्यक्त केले.