सांगवी : बारामती तालुक्यातील सांगवी येथे नागरिकांसाठी पुन्हा एकदा सर्वेक्षणाच्या माध्यमातून शुक्रवारी (दि. १६) आरोग्य तपासणी होणार आहे. तर गावातील सर्व व्यावसायिक दुकानदार यांची अँटिजेन तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी तावरे व सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी जनार्दन सोरटे यांनी दिली.
डिजिटल थर्मामीटरच्या साह्याने शारीरिक तपासणी पल्स ऑक्सिमिटरच्या साहाय्याने शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासण्यात येणार आहे. तर ज्या नागरिकांना संशय वाटल्यास या मोहिमे अंतर्गत अँटिजेन तपासणी करून घेण्याची मुभा देण्यात आली आहे.
बारामती तालुक्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हाहा:कार उडाला आहे. लॉकडाऊनच्या भीतीमुळे सर्वसामान्य नागरिकांसह छोटे- मोठे व्यावसायिक देखील डबघाईला आले आहेत. प्रशासनावर ताण असून देखील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी युध्दपातळीवर न थकता कार्यरत आहे. मात्र, तरी देखील रुग्णांची संख्या घटण्याऐवजी वाढताना पाहायला मिळत आहे.
सांगवीत मोठी बाजारपेठ असल्याने पंचक्रोशीतील शेकडोहून अधिक नागरिक विविध खरेदीसाठी येत असतात, गावातील नागरिकांसह बाहेरील गावातील येणारे लोक देखील हलगर्जीपणा करून विनामास्क फिरत असल्याने याला अपवाद ठरत आहे. यामुळे सांगवीत रुग्णांचा आकडा आता दोनशेच्या घरात पोहचला आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सांगवीत शुक्रवारी (दि. १६) १ हजार ३८२ कुटुंबासह गावातील दुकानदारांची तपासणी होणार आहे. या दरम्यान संशयित आढळणाऱ्या रुग्णांची अँटिजेन तपासणी करण्यात येणार आहे. तसेच गावातील सर्व दुकानदारांची सरसकट ही तपासणी करण्यात येणार आहे. या अगोदर देखील दोन वेळा 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' अंतर्गत सर्वेक्षण करण्यात आले होते.
कोरोनाशी लढा देण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग सज्ज आहे. मात्र, गावातील सर्व नागरिकांनी वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तपासणी करून स्वत:सह कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी तावरे यांनी केले आहे.