आयसीएमआरची मान्यता : पुण्यातील मायलॅबतर्फे ''कोव्हिसेल्फ''ची निर्मिती
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनासदृश लक्षणे दिसू लागल्यास कोरोनाची लागण झाली आहे का, याचे निदान करण्यासाठी शासकीय केंद्र, खासगी प्रयोगशाळेमध्ये आरटीपीसीआर किंवा रॅपिड अँटिजन टेस्ट केली जाते. आता अँटिजन टेस्ट घरबसल्या करणे शक्य होणार आहे. पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशनने स्वदेशी बनावटीची 'कोविसेल्फ' ही अँटिजन टेस्ट किट विकसित केली आहे. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेतर्फे किटला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाचे निदान कमी वेळेत आणि अचूक पद्धतीने होणार आहे.
घरच्या घरी चाचणी करण्यासाठी किट आणि मोबाइल अॅप्लिकेशन देण्यात आले आहे. 'कोविसेल्फ' या किटमधील स्टिक वापरून नाकातील स्रावाचा नमुना घेता येईल. नमुना ठेवण्यासाठी किटबरोबर एका छोटी बाटली आणि स्ट्रीप दिली जाणार आहे. बाटलीतील नमुन्याचे काही थेंब स्ट्रीपवर टाकल्यावर निष्कर्ष काढता येईल. मोबाइलवर ॲॅपवर स्ट्रिपचा फोटो काढून पाठवल्यावर हा डेटा आयसीएमआरच्या टेस्टिंग पोर्टल स्टोअरवर नोंदवला जाणार आहे. अॅपमार्फत पॉझिटिव्ह अथवा निगेटिव्ह रिपोर्ट रुग्णाला मिळू शकेल.
अमेरिकेच्या तुलनेत भारतात किट कमी किमतीत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. प्रत्येक किटमध्ये माहितीपत्रक आणि सूचनापत्र दिले जाणार आहे. भारतात या किटची किंमत २५० रुपये एवढी निश्चित करण्यात आली आहे. लवकरात लवकर हे संच विक्रीसाठी उपलब्ध होतील, अशी माहिती मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्सचे सुजित जैन यांनी दिली. रुग्णाची माहिती पूर्णपणे गुप्त ठेवली जाणार आहे.
---
अँटिजन किट वापरण्यास सुलभ, आरामदायी, सोपी, व्यवहार्य आणि अचूक असेल यावर भर देण्यात आला आहे. आपण कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आलो असू अथवा लक्षणे दिसत असतील तर घरच्या घरी या किटच्या साहाय्याने चाचणी करता येणार आहे. किटमधील चाचणी पॉझिटिव्ह आल्यास आपण १०० टक्के कोरोनाग्रस्त आहोत, असे समजावे. किटमध्ये निगेटिव्ह निदान झाल्यास आरटीपीसीआर टेस्ट करून घ्यावी. पुढील आठवड्यापासून ७० लाख चाचण्या दर आठवड्याला केल्या जाणार आहेत. त्यानंतर एका आठवड्यात चाचण्या दुप्पट केल्या जातील.
- हसमुख रावळ, व्यवस्थापकीय संचालक