पुणे : फॅन्टम फिल्म कंपनीच्या कथित कर चुकवेगिरी प्रकरणामध्ये बुधवारी सकाळपासून दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नूची पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये चौकशी सुरू आहे. ही चौकशी शुक्रवारीदेखील सुरू राहण्याची शक्यता प्राप्तिकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तविली. दोघेही त्यांच्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणासाठी पुण्यात आलेले आहेत.
प्राप्तिकर विभागाच्या मुंबईच्या ‘इन्व्हेस्टिगेशन टीम’ने बुधवारी सकाळीच फॅन्टम फिल्म कंपनीशी संबंधित मुंबई, पुण्यासह विविध ठिकाणांवर छापेमारी सुरू केली होती. अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांच्या आगामी ‘दोबारा’ या सिनेमाचे पुण्याजवळ चित्रीकरण सुरू आहे. त्यांचा मागील चार-पाच दिवसांपासून हिंजवडी परिसरातील हॉटेल सयाजीमध्ये मुक्काम आहे. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या हॉटेलमध्येच त्यांना गाठत चौकशी करण्यास सुरुवात केली. या दोघांसोबत आणखीही तीन-चार जण सोबत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या चौकशीदरम्यान कोणालाही बाहेर सोडण्यात येत नव्हते. हॉटेल प्रशासनालाही सक्त सूचना देण्यात आलेल्या होत्या. याबाबत हॉटेल प्रशासनाकडे चौकशी केली असता त्यांनी कश्यप आणि तापसी यांचा मुक्काम हॉटेलमध्ये असल्याची माहितीच नाकारली. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शुक्रवारीही दोघांची चौकशी होण्याची शक्यता असून मुंबई, पुणे आणि दिल्लीत करण्यात आलेल्या छापेमारी आणि चौकशीमध्ये जवळपास सव्वाशे अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
--------