पुणे : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभिनय, दिग्दर्शन, नैपथ्य, संगीत यांचे व्यासपीठ मिळवून देणारी स्पर्धा म्हणजेच फिरोदिया करंडक होय. गेल्या दोन वर्षात अशा नाट्य स्पर्धांपासून विद्यार्थी मुकले होते. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने निर्बंध कमी करण्यात आले. त्यामुळे यावर्षी पुरुषोत्तम नंतर फिरोदिया करंडक स्पर्धा पार पडली. यंदा फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन नाटयस्पर्धेत पुण्यातील ३६ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ९ महाविद्यालयांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली. २४ मार्चला फिरोदिया करंडक स्पर्धेचा बक्षीस समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या पारितोषिक वितरण सोहळ्यात सुप्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक अनुराग कश्यप उपस्थित राहणार आहेत.
गँग्स ऑफ वासेपूर, गुलाल, अगली, रमण राघव, देव डी, नो स्मोकिंग, हंटर, अय्या असे अनेक चित्रपट अनुराग कश्यप यांनी दिग्दर्शित केले आहेत. त्यांच्या बऱ्याच चित्रपटावरून वादही झाले आहेत. अनुराग कश्यप यांचे अनेक चित्रपट गाजलेले असून तरुणाई अत्यंत आवडीने त्यांचे कुठलेही चित्रपट पाहण्यास उत्सुक असते. समाजातील वास्तव, देशात घडलेल्या दुःखद घटनेवर आधारित चित्रपट अनुराग कश्यप यांच्या दिग्दर्शनातून पाहायला मिळतात. अंगावर येणारी हिंसाचाराची दृश्ये, चित्र-विचित्र स्वरूपाची अनैतिक कृत्ये करणारी पात्रे, अशा पात्रांच्या मनोभूमिकेचे केलेले प्रभावी विश्लेषण, बहुतांश चित्रपटांमध्ये न-दिसणारे जग खोलात शिरून दाखवणे, वास्तववादी भासणारे चित्रण, संगीताचा वैशिष्ट्यपूर्ण वापर या त्यांच्या चित्रपटांमध्ये आढळून येणाऱ्या ठळक गोष्टी आहेत. सध्या गंगुबाई काठियावाडी, झुंड, काश्मीर फाईल्स अशा चित्रपटांवरून वाद सुरु आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अनुराग कश्यप पुण्यात आल्यावर काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
कश्यप यांचे गाजलेले चित्रपट
पुण्यातील गाजलेल्या जोशी-अभ्यंकर हत्याकांडावर आधारीत असणारा पाँच हा चित्रपट दिग्दर्शक म्हणून अनुराग यांनी बनवलेला पहिला चित्रपट होय. मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोट मालिकेवर आधारित ब्लॅक फ्रायडे नावाचा चित्रपट अनुराग कश्यप यांनी काढला होता. या चित्रपटावर केंद्रीय अभ्यवेक्षण मंडळाने मुंबई बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल लागेपर्यंत तीन वर्षांकरिता बंदी घातली. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षक आणि समीक्षकांची वाहवा मिळवली. याच वर्षी आलेल्या नो स्मोकिंग या चित्रपटाला मात्र प्रेक्षक आणि समीक्षकांनी नाकारले. अमेरिकन रहस्य कथालेखक स्टीफन किंग यांच्या लघुकथेपासून प्रेरणा घेऊन हा चित्रपट बनवण्यात आला होता. २००९ मध्ये त्यांनी पटकथालेखन, दिग्दर्शन व अभिनय केलेल्या देव डी या ‘देवदास’ च्या आधुनिक अवताराला प्रेक्षक आणि समीक्षकांनी पसंती दर्शवली. या चित्रपटाचे लेखनही त्यांनीच केले होते. गुलाल या त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला मात्र समीक्षकांची पसंती मिळूनही, प्रेक्षकांनी त्याकडे पाठ फिरवली. गँग्स ऑफ वासेपूर (२०१२) हा दोन भागांत प्रदर्शित करण्यात आलेला चित्रपट धनबाद येथील कोळसा माफिया आणि त्यांच्या गुन्हेगारी जगतावर प्रकाश टाकणारा होता.
फिरोदियाची अंतिम फेरी १९ मार्चला
फिरोदिया स्पर्धेची अंतिम फेरी १९ मार्च रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक सभागृहात होणार आहे.स्पर्धेची अंतिम फेरी 19 मार्चला सकाळी 9 ते रात्री 9 यावेळेत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात होईल. त्याचवेळी करंडक विजेता संघ आणि वैयक्तिक पारितोषिक विजेत्यांची नावेही जाहीर करण्यात येतील, असे आयोजकांकडून सांगण्यात आले.