एकाच दिवशी पशुधारकाचे पाच लाख रुपयांचे नुकसान
डाळज: इंदापूर तालुक्यातील डाळज परिसरामध्ये लाळखुरकत या विषाणूजन्य रोगामुळे जनावरांचा सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असून डाळज नं. ३ येथील गणेश आबासाहेब जगताप या पशुधारकाच्या गोठ्यातील एका दिवशी एक-दोन नव्हे तर चक्क दहा दुभत्या गायी मरण पावल्या. या परिसरातील पशुधारकांना आपल्या जनावरांची या रोगापासून सुरक्षा कशी करावी हा प्रश्न पडत आहे.
कोविड या रोगामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. त्यातच शेतकरी हा जिद्दीने शेती करत आहे, परंतु शेतमालाला चांगला बाजारभाव मिळत नसल्याने शेतीही परवडत नाही, त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकरी शेती पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करतात, परंतु काही दिवसांपासून या व्यवसायाला लाळखुरकत या विषाणूजन्य रोगामुळे पशुधारकांना त्रस्त केले आहे. डाळज परिसरात गेल्या काही दिवसांपासून या रोगामुळे जनावरे मरण पावत आहेत. डाळज परिसरात ८ वासरे, १२ दुभती जनावरे मरण पावली असून १५३ जनावरे या रोगाने ग्रस्त असून यावर पशुसंवर्धन विभागाने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी पशुधन पालकांकडून होत आहे.
यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले की, १ सप्टेंबर पासून इंदापूर तालुक्यात सर्वत्र लसीकरणाला सुरुवात झाली असून एखादे जनावर लाळखुरकत रोगाने दगावले असल्यास त्या पशुधारकाला जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पंधरा हजार रुपये दिले जाणार आहे असे सांगितले.
गणेश जगताप, पशुधारक - माझ्या गोठ्यातील गुरांना ताप आला असता पशुवैद्यकाकडून त्यांची तपासणीही करण्यात आली. त्यावर उपचारही केले, परंतु रोगांचे निदान न झाल्याने दहा जनावरे मरण पावले, यामुळे माझे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य निराशेच्या गर्तेत आहेत, इंदापूर तालुक्याचे आमदार तसेच पशुसंवर्धन खात्याचे मंत्री दत्तात्रय भरणे व पशुसंवर्धन प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेऊन पशुधारकांना आर्थिक मदत करावी अशी मागणी केली . तसेच यापूर्वी लाळखुरकत या रोगामुळे मोठी जनावरे मरण पावत नव्हती परंतु आताच्या या विषाणूजन्य रोगामुळे जनावरांना ताप येऊन अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मोठी जनावरे मरण पावत आहेत.