लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यातील ७४८ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली आहे. राखीव जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची जात वैधता प्रमाणपत्रासाठी धावपळ सुरू आहे. या इच्छुकांना राज्य निवडणूक आयोगाने दिलासा दिला आहे. राखीव जागांवर ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास पडताळणी समितीकडे हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी केलेल्या अर्जाची सत्यप्रत अथवा पोहोचपावती किंवा अर्ज केल्याबाबतचा कोणताही पुरावा सादर करण्याची मुभा राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत उमेदवारांना दिली आहे.
राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी जिल्हा निवडणूक प्रशासनाला यासंदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने ११ डिसेंबर रोजी जाहीर केलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ३० डिसेंबर पर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.
राखीव जागांवर निवडणूक लढविण्यासाठी नामनिर्देशपत्र दाखल करताना जातवैधता प्रमाणपत्र नसल्यास जात पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जाबाबतचा पुरावा सादर करता येईल. विजयी झाल्याच्या दिनांकापासून १२ महिन्यांच्या आत पडताळणी समितीने दिलेले जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे हमीपत्र सोबत द्यायचे आहे.
यामुळे जात पडताळणीसाठी ऐनवेळी होणारी गर्दी आणि या समितीच्या कार्यालयातील गैरव्यवहार थांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे.