शिरूर : राजकारणात कधीही कोणाशीही दोस्ती करण्याची वेळ येईल हे सांगता येत नाही, असे येथे वक्तव्य करून केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी भाजपाला सूचक इशारा दिला. राजकीय परिस्थितीवर आपल्या खास शैलीत चारोळ्या सादर करून धमाल उडवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. शिरूर पासपोर्ट सेवा केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आठवले आज शिरूरला आले होते.
खासदार शिवाजीराव आढळराव पाटील अध्यक्षस्थानी होते. आमदार बाबूराव पाचर्णे, नगराध्यक्षा वैशाली वाखारे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्षा जयश्री पलांडे, भारतीय पासपोर्ट अधिकारी एसएफएच रिजवी, पोस्ट कार्यालयाचे विभागीय अधिकारी ताकवले, भाजपाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख अॅड. धर्मेंद्र खांडरे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अनिल काशिद, तालुकाप्रमुख पोपट शेलार, शहरप्रमुख संजय देशमुख, महिला जिल्हा उपसंघटक विजया टेमगीरे, तालुका संघटक शैलजा दुर्गे, अनघा पाठक , रेश्मा शेख,पं.स.सदस्य डॉ बबन पोकळे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, शहराध्यक्ष निलेश जाधव, भाजपाचे शहराध्यक्ष केशव लोखंडे,नगरसेविका अंजली थोरात, पुजा जाधव, विनोद भालेराव,मंगेश खांडरे,माजी उपनगराध्यक्ष नेमीचंद फुलफगर किरण देशमुख, गणेश जामदार आदि यावेळी उपस्थित होते.
गेल्या आठवड्यात भाजपा शिवसेनेची युती झाली. त्यांनी लोकसभेच्या जागेसंदर्भातही कोण किती जागा लढणार याबाबतही घोषणा केली. घटक पक्षांबाबत मात्र युतीने भुमिका स्पष्ट न केल्याने अस्वस्थ असलेल्या आठवले यांनी आज येथे भाजपा शिवसेनेची तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.महाराष्टाच्या व देशाच्या भल्यासाठी भाजपा शिवसेना युती व्हावी.अशी भुमिका आपण सातत्याने मांडली. अखेर वाद मिटला. युती झाल्याचे आठवले म्हणाले. मात्र अचानक त्यांनी पवित्रा बदलत,कॉग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सोबत होतो, शरद पवार यांच्याशी आजही मैत्रीचे संबंध आहेत. राजकारणात मार्ग वेगळे असलेतरी दोस्ती तोडायची नसते.असे सांगतानाच कधी कोणाबरोबर दोस्ती करण्याची वेळ येईल, हे सांगता येत नाही.असे वक्तव्य करून दुर्लक्ष करणाऱ्या भाजपाला सुचक इशारा देण्याचा प्रयत्न केला.
इशारा दिला असला तरी आठवले यांनी नरेंद्र मोदी व सरकारचे भरभरून कौतुक केले. ह्यपासपोर्ट आॅफिस मुळे मला होत आहे हर्ष... कारण २०१९ हे आहे नरेंद्र मोदींचे वर्ष ह्य या चारोळ्यांनी त्यांनी भाषणाची सुरुवात केली. पंतप्रधान मोदी हे सर्वात अॅक्टीव्ह पंतप्रधान असल्याचे सांगतानाच जनतेच्या शंभर टक्के अपेक्षा पुर्ण झाल्या नसल्यातरी सरकारने मोठ्या प्रमाणावर कामे केल्याचे आठवले म्हणाले.एकंदरीतच युतीकडून आठवलेंच्या अपेक्षा पुर्ण न झाल्यास इशारा दिल्याप्रमाणे आठवले मित्र बदलतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.