...अन्यथा जेलची हवा खावी लागेल : अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 10:52 AM2024-09-22T10:52:43+5:302024-09-22T10:52:50+5:30
सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांना १,५०० रुपयांची किंमत काय कळणार
दिघी : सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांना १,५०० रुपयांची किंमत काय कळणार, असा सवाल करीत लाडकी बहीण योजनेत कोणी खाेटं करण्याचा प्रयत्न केला तर त्याला जेलची हवा खावी लागेल, असा इशारा शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. श्रीवर्धन येथील राऊत विद्यालयाच्या पटांगणात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जनसंवाद यात्रेत ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर खासदार सुनील तटकरे, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, सुधाकर घारे, माजी खासदार आनंद परांजपे, माजी आमदार अनिकेत तटकरे, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर, मुश्ताक अंतुले, दर्शन विचारे, जितेंद्र सातनाक उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, लाडकी बहीण योजनेत कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होऊ दिला नाही. एका पठ्ठ्याने स्वतःच्या पत्नीचे २८ फोटो काढून पैसे मिळविले, मात्र ते लक्षात आले. असे खोटे काम करणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असे सांगितले. या वेळी त्यांनी महिलांना सक्षम बनवण्याबरोबर त्यांची सुरक्षादेखील महत्त्वाची असल्याचे सांगत महिलांवर काही विकृत नराधम अत्याचार करतात. त्यांना फाशी किंवा जन्मठेप हीच शिक्षा झाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
टीका करण्याचा अधिकार नाही
या वेळी त्यांनी भाजप नेते नितेश राणे यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. समाजात वेडेवाकडे बोलण्याचा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत आपल्याला दिलेला नाही. आपण मत मांडू शकता, पण जाती किंवा पंथावर टीका टिप्पणी करण्याचा अधिकार दिलेला नाही. असे वक्तव्य करणाऱ्यांबद्दल कायदा आपलं काम करेल, असेही त्यांनी सांगितले.
गुणवत्तेच्या जोरावर आम्हालाच न्याय मिळेल
आम्ही कायद्याच्या कसोटीवर निर्णय घेतला आहे. म्हणूनच निवडणूक आयोगाने अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून घड्याळाच्या चिन्हासह मान्यता दिली आहे. बुधवारी यावर सुनावणी असून, गुणवत्तेच्या जोरावर आम्हालाच न्याय मिळेल, असा विश्वास खासदार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. सिनेटच्या निवडणुका रद्द करण्यात आल्याबाबत तटकरे यांनी नेते स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून तयार झाले आहेत. या निवडणुका वेळेत व्हायला पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.