लोकमत न्यूज नेटवर्क
बाभुळगाव : खासदार उदयनराजे भोसले यांचेविषयी अपशब्द वापरून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी इंदापूर तालुक्यातील लोणीदेवकर एमआयडीसी येथील उद्योजक अशोक जिंदाल यांना संतप्त कार्यकर्त्यांनी तोंडाला काळे फासत मारहाण केल्याची घटना गुरूवारी (दि २३) घडली. याबाबत अशोक जिंदाल यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
उद्योजक जिंदाल यांनी खासदार उदयनराजे यांच्याबद्दल अपशब्द वापरले. यामुळे शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी जिंदाल यांच्या अंगावर व तोंडावर काळी शाई टाकून त्यांना मारहाण केली. तसेच त्यांना इंदापूर पोलिस ठाण्यात हजर केले व कारवाईची मागणी केली. जिंदाल यांनीही आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला. त्यांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
चौकट
सात जणांना अटक व सुटका.
उद्योजक अशोक जिंदाल यांना इंदापूर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांच्या तोंडाला मास्क नव्हते तसेच त्यांना मारहाण करण्यात आल्याने व कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने इंदापूर पोलिसांनी शिवधर्म फाउंडेशनचे प्रमुख दीपक उर्फ सिताराम काटे (वय २८, रा.इंदापूर), अमोल अंकुश पवार (वय २५, रा. अकलूज), कुणाल शिवाजी चव्हाण (वय ३३, रा. अकलूज जि. सोलापूर), प्रदीप चंद्रकांत भोसले (वय २४ रा.अकलूज), किरण रवींद्र साळुंखे (वय २७ रा. भवानीनगर ता. इंदापूर), अक्षय चंद्रकांत चव्हाण (वय २५ रा. बारामती), सुनील विठ्ठल वायकर (वय ३३, रा. अकलूज) व त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करून अटक केली. त्यांना शुक्रवारी (दि २५) इंदापूर न्यायालयात हजर केले असता आरोपींची १५ हजार रूपये जातमुचुलक्याच्या जामीनावर सुटका करण्यात आली.