पुणे : भारतीय चित्रपटसृष्टीत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री अपर्णा सेन आणि प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांना पंधराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. संगीत क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल दिला जाणारा एस. डी. बर्मन आंतरराष्ट्रीय क्रिएटिव्ह अॅवॉर्ड आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना प्रदान केला जाणार आहे.महोत्सवाचे अध्यक्ष जब्बार पटेल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत या पुरस्कारार्थींच्या नावांची घोषणा केली. सचिव रवी गुप्ता, क्रिएटिव्ह डायरेक्टर समर नखाते, एनएएफआयचे संचालक प्रकाश मगदूम, पिफ बझारचे समन्वयक श्रीरंग गोडबोले आदी मान्यवरही या वेळी उपस्थित होते.१२ जानेवारी रोजी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात सायंकाळी ४.३० वाजता कोथरूड येथील सिटी प्राईड चित्रपटगृहामध्ये हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. या वेळी इंडो -स्पेन मैत्रीला ६० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘फ्लेमिंको’ हा नृत्यप्रकारही उद्घाटन सोहळ्यात दाखविला जाणार आहे. बार्बराएडर दिग्दर्शित ‘थँकयू फॉर बॉम्बिंग’ (आॅस्ट्रिया) हा ओपनिंग चित्रपट पाहता येणार आहे. अपर्णा सेन या भारतीय चित्रपटसृष्टीत निर्मात्या - दिग्दर्शक, पटकथालेखक आणि अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांना ९ आंतरराष्ट्रीय, तर ३ राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. पद्मश्री हा बहुमानही त्यांना मिळाला आहे. मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीत सीमा देव यांनी आपल्या अभिनयकौशल्याने ठसा उमटविला आहे. आतापर्यंत त्यांनी ८० हून अधिक मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच भारतीय अभिजात संगीतक्षेत्रात उस्ताद झाकीर हुसेन यांनी स्वत:चा वेगळा ठसा उमटविला आहे. महोत्सवाच्या मराठी स्पर्धात्मक विभागात डॉक्टर रखमाबाई, लेथ जोशी, व्हेंटिलेटर, एक ते चार बंद, दशक्रिया, घुमा आणि नदी वाहते या सात चित्रपटांची निवड झाली आहे. (प्रतिनिधी)पिफ बझारच्या मुख्य स्टेजला ओम पुरी यांचे नाव महोत्सवात पिफ बझार अंतर्गत उभे राहणाऱ्या पॅव्हेलियनला या वर्षी दादासाहेब फाळके पॅव्हेलियन देण्यात आले आहे, तर दिवंगत अभिनेते ओम पुरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुख्य स्टेजचे नामकरण ‘ओम पुरी रंगमंच’ असे करण्यात आले आहे. याबरोबरच यावर्षीच्या विजय तेंडुलकर मेमोरियल व्याख्यानात यावर्षी चिलीचे जॉर्ज अरीगेडा यांचे ‘संगीतध्वनींचा चित्रपटात होणारा वापर’ या विषयावर व्याख्यान होणार आहे, तर पिफ बझारअंतर्गत याहीवर्षी व्याख्याने, कार्यशाळा, चर्चासत्रे यांची पर्वणी असेल. यामध्ये माध्यमांतर, कविता, व्हर्च्युअल रिअॅलिटी फॅड की फ्युचर यांसारख्या विविध विषयांवर चर्चा होतील. पिफ बझारमध्ये जेम्स आॅफ एनएफएआय या विभागाअंतर्गत एनएफएआयमधील चित्रपट पाहण्याची संधीही रसिकांना मिळणार आहे. अपर्णा सेन यांच्या ‘चौरंगी लेन’ हा ३५ एमएममधला चित्रपट राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने जतन केला आहे, त्या चित्रपटाबरोबरच कोमल गंधार, गुळाचा गणपती, तनीर तनीर, दो बिघा जमीन, मधुमिलन हे चित्रपट रसिकांना पाहता येतील. पिफमध्ये भारतीय चित्रपटांची स्पर्धा घ्यायची इच्छा; बजेटच नाही पिफचे अंदाजपत्रक दीड कोटी असते. त्यातील सत्तर लाख सरकारतर्फे दिले जातात, तर उर्वरित सत्तर लाख नोंदणी, प्रायोजकत्व यातून जमा केले जातात. सरकारने दिलेल्या सत्तर लाखांपैकी वीस लाख विविध पुरस्कारांवर खर्च होतात. कोलकाता, केरळ या महोत्सवांसाठी सात, तर गोव्याच्या इफ्फी महोत्सवासाठी चौदा कोटी अंदाजपत्रक असते. या तुलनेत पिफचे अंदाजपत्रक अगदीच कमी असल्याने ते वाढवून मिळावे, यासाठी पुणे फिल्म फाउंडेशन गेल्या तीन वर्षांपासून प्रयत्नशील आहे. मात्र शासनदरबारी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, एवढे आश्वासन मिळण्यापलीकडे काही झाले नाही.
महोत्सवात विविध भारतीय भाषांचे चित्रपट असतात, पण त्यांच्यामध्ये स्पर्धा होत नाही. मराठी व जागतिक चित्रपटांच्या स्पर्धेप्रमाणे भारतीय चित्रपटांची स्पर्धा व्हावी, असा प्रस्ताव सरकारकडे दिला आहे. सरकारशी प्राथमिक बोलणी झाली असून तत्त्वत: हा प्रस्ताव मान्य झाला आहे. कदाचित पुढच्या वर्षी ही स्पर्धा होण्याची शक्यता आहे- रवी गुप्ता, महोत्सव सचिव