दावडी : काळाबाजारात जाणारा रेशनचा धान्यसाठा गावकऱ्यांनी पकडला. मात्र, तालुका पुरवठा अधिकारी रोकडे यांनी घटनास्थळी येण्यासाठी चालढकलपणा केल्यामुळे स्वस्त धान्य दुकानदाराने हा धान्यसाठा गायब केल्याचे दावडी येथे उघडकीस आले आहे. दरम्यान, याप्रकरामुळे सरपंचासह ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला असून संबंधित दुकानदारावर कारवाई करावी, अशी मागणी दावडीचे सरपंच संभाजी घारे, उपसरपंच राहुल कदम, पोलिस पाटील आत्माराम डुंबरे, संतोष सातपुते, हिरामण खेसे, मारुती बोत्रे, अनिल नेटके यांनी केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दावडी येथील स्वस्तधान्य दुकान महालक्ष्मी बचत गटाला चालविण्यात देण्यात आले आहे. काही महिन्यांपासून लाभार्थ्यांना काहीही कारणे सांगून धान्य दिले जात नव्हते. तसेच कोरोना काळात कुटुंबाना मोफत धान्य शासनाकडून आले होते. ते लाभार्थी यांना वाटप न करता स्वस्त धान्य दुकानातून गेली ३ दिवस धान्याची पोती मोटारसायकलवर वाहून दावडी (ता. खेड ) येथे जाधवदरा येथील राजाराम गेनू दिघे यांचा घरात सुमारे ३८ गव्हांची पोती लपविण्यात आली होती. तीन दिवस स्वस्त धान्य दुकानातून पोते घेऊन जात असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने दक्षता कमिटीतील सदस्यानी गावात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यामध्ये ही सर्व पोती दिघे यांच्या घरात जात असल्याचे दिसले. त्यानंतर दिघे यांच्या घरी जाऊन पाहणी केली असता सुमारे ३८ गव्हाची पोती आढळून आली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याबाबत तालुका पुरवठा अधिकारी रोकडे यांना माहिती देण्यात आली. त्यांना घटनास्थळी बोलावण्यात आले. परंतु, त्यांनी मी बाहेर आहे, दुसरे कोणाला तरी पाठवितो अशी उडावाउडवी उत्तरे देऊन येण्यास टाळले.
दरम्यानच्या काळात स्वस्त धान्य दुकानदाराला याची कुणकुण लागताच त्याने सर्व पोती एका वाहनातून दिघे यांच्या घरातून गायब केली. त्यानंतर मंडल अधिकारी विजय घुगे यांनी घटनास्थळी आले. परंतु, त्यांना पोती काही आढळून आली नाही. त्यानंतर दुकानात पाहणी केली असता तांदळाची तफावत आढळून आली.
जुलै२०२१साठी १४५०० किलो प्राधान्य गहू, ८०० किलो अंत्योदय गहू, ९७०० किलो प्राधान्य तांदुळ, व ३०० किलो अंत्योदय तांदुळ, आलेला आहे. त्यापैकी १७६०२ किलो गहू व ११५६० तांदुळ वाटप केला आहे.
वंदना सातपुते, रेशन दुकानदार.
१२९५० किलो गहू व ८५५० किलो तांदूळ दुकानात आढळून आला आहे. तसेच दि २१ रोजी मोफत तांदुळ ३०० कट्टे व गहू २०३ कट्टे दुकानात वाटपासाठी आले आहेत. यामध्ये तफावत आढळत आहे. याबाबत पंचनामा केला असून वरिष्ठाकडे देण्यात आला आहे.
विजय घुगे, मंडल अधिकारी
राजाराम दिघेंनी दिली कबूली
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिघे दुचाकीवरून ३८ पोती राजाराम दिघे यांच्या घरात ठेवण्यात आल्याचे समोर आले. पंचनाम्या दरम्यान, राजाराम दिघे यांनी हे गव्हाचे कट्टे आपल्या घरात होते. गावकऱ्यांना कुणकुण लागताच धान्य दुकानदाराने येथून दुसरीकडे हलवल्याची कबुली दिली. महत्त्वाचे म्हणजे, रेशन दुकानदाराने दिघे यांना सांगितले होते कि, या बदल्यात एक गव्हाचा व तांदळाचा कट्टा देण्याचे ठरले होते. असेही दिघे यांनी सांगितले.