पुणे : खासगी प्रवासी वाहतुक कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी रिक्षाचालकांची धडपड सुरू आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य चालक मालक प्रतिनिधी महासंघाने पुढाकार घेत रिक्षाचालक व प्रवाशांसाठी ‘रिक्षा’ हे अॅप तयार केले आहे. या अॅपच्या माध्यमातून रिक्षाचालकांचा व्यवसाय ‘डिजिटल’ होणार आहे.देशभरात अनेक बड्या खासगी प्रवासी वाहतुक कंपन्यांनी या व्यवसायात शिरकाव केला आहे. मोबाइलवरील एका क्लिकवर वाहन घरासमोर येत असल्याने या सेवेला प्रतिसादही चांगला मिळत आहे. या स्पर्धेमध्ये टिकून राहण्याचे आव्हान रिक्षाचालकांसमोर उभे राहिले आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून रिक्षाचालकही टेक्नोसॅव्ही होण्यासाठी धडपडत आहेत. अनेक रिक्षाही खासगी कंपन्यांशी जोडल्या गेल्या आहेत. यापार्श्वभूमीवर महासंघाने त्रेताकल्प संस्थेच्या साह्याने ‘रिक्षा’ हे अॅप विकसित केले आहे. त्याचे अनावरण मंगळवारी (दि.१८) करण्यात आले. यावेळी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर, ग्राहक पेठेचे सुर्यकांत पाठक, महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे, त्रेताकल्प संस्थेचे अध्यक्ष राहुल शितोळे आदींची उपस्थिती होती. शहरातील सर्व रिक्षा संघटनांचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.सध्या या अॅपद्वारे प्रवाशांना प्रवास सुरू करण्यापूर्वीच त्यांच्या मोबाइलवर भाडे किती होईल, याची माहिती मिळणार आहे. त्यासाठी रिक्षाचालकांना मोबाइल क्रमांक द्यावा लागेल. थेट घरून रिक्षा मागविण्याची सुविधा काही दिवसांत सुरू होणार आहे.
रिक्षा व्यावसायिकांसाठी अॅप; व्यवसायवाढीसाठी होणार फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 3:06 AM