किसान ॲपचा वापर वाढला : जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्यांची पसंती वाढतेय
पुणे : जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्यांकडून अँड्रॉइड मोबाईल वापर वाढला आहे. जोडीला मोबाईल कंपन्याकडून ग्रामीण भागात मोबाईल सेवा (स्पीड) दिवसेंदिवस आणखी सुधारत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने शेतीसंदर्भातील माहिती, अॅलर्ट आणि उपाययोजनांसाठी शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या तब्बल १८ प्रकारच्या विविध ‘ॲप’ला प्रतिसाद वाढत आहे. जिल्ह्यातील तरुण शेतकरी या ‘ॲप’चा सर्वाधिक वापर करत असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने शेती अधिकाधिक किफायतशीर आणि फायदेशीर व्हावी. त्यातून शेतकऱ्यांना कमीत कमी नुकसान आणि जास्तीत जास्त फायदा व्हावा. यादृष्टीने शेतकऱ्यांनी कोणती पिके घ्यावीत, रोगराईपासून या पिकांचे कसे संरक्षण करावे. तसेच बदलत्या हवामान आणि चक्रीवादळ याची त्वरित माहिती देऊन शेतकऱ्यांनी काय उपाययोजना कराव्यात याबाबत याविषयी १८ प्रकारच्या विविध ''अॅप''च्या माध्यमातून करण्यात येत आहे. बदलत्या हवामानानुसार पिकांवर येणाऱ्या कीड, विविध रोगांचा अलर्ट त्वरेने शेतकऱ्यांना दिला जात आहे.
---
मंडल, तालुका, जिल्हास्तरावरील आजपर्यंतचा आणि सर्वसाधारण पाऊस याबाबतची माहिती, त्याचबरोबर बदलते हवामान, चक्रीवादळ, पिकांवर पडणाऱ्या कीडरोगांची माहिती शेतकऱ्यांना मिळत आहे. तरुण शेतकरी स्वतः बरोबर परिसरातील ज्येष्ठ शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करत आहेत.
- ज्ञानेश्वर बोटे, जिल्हा कृषी अधीक्षक
---
ॲपवर कोणती माहिती मिळते?
* पीकविम्याबाबत माहिती
* कृषी हवामानविषयक उपयुक्त सल्ले
* बाजारभाव आणि पीक संरक्षणविषयी माहिती
* मुख्य पिकांवरील कीड व्यवस्थापनाची माहिती
* ५० किलोमीटरवरील शेती उत्पादनाच्या बाजारभावाची माहिती
* जिल्हा आणि राज्यस्तरावरील बाजार समितीतील बाजारभावाच्या दराची माहिती
* तालुक्यातील खते, बियाणे, औषधांची माहिती
---
किसान ॉपमधील शेतीविषयक लेखमालिकांमधून विविध पिके, रोग, कीड याबाबत माहिती दिली जाते. मात्र, यातील भाषा कठीण आणि तांत्रिक असते. ती समजायला कठीण जाते. त्यामुळे सोप्या भाषेत माहिती मिळाली तर अधिक चांगले होईल.
- आप्पासाहेब कदम, शेतकरी
---
हवामान बदलाविषयी अनेकदा उशिराने माहिती मिळते. विशेषतः नुकतेच येऊन गेलेले तौक्ते वादळाची माहिती काहीशी उशिराने अपडेट केली. त्यामुळे फार काही नुकसान झाले नाही. मात्र, लवकर माहिती मिळाली तर तयारी करता येते.
- बाळासाहेब भोसले, शेतकरी
---
पुणे जिल्ह्यातील हवामान फळबागांसाठी किती पोषक आहे. यात संत्रा, मोसंबी, चिकू, डाळिंब, द्राक्ष व इतर कोणत्या प्रकारची फळं आम्ही घेऊ शकतो. ती येथील वातावरणात येईल का, तसेच त्यावर पडणाऱ्या रोगांची माहिती तालुका, जिल्हानिहाय मिळाली तर सोयीचे होईल.
- गजानन साकोरे, शेतकरी
----
केंद्र आणि राज्य सरकारचे शेतीविषयक अधिकृत १८ अॅप
* शेतकरी मासिक
* महा रेन
* क्रॉप क्लिनिक
* कृषी मित्र
* एम किसान भारत
* किसान सुविधा
* पुसा कृषी
* क्रॉप इन्शुरन्स
* डिजिटल मंडी भारत
* अग्री मार्केट
* पशु पोषण
* कॉटन
* एकात्मिक कीड व्यवस्थापन
* हळद लागवड
* पीक पोषण
* लिंबू वर्गीय फळझाडांची लागवड
* शेकरू
* इफको किसान