लोणी काळभोर : पुणे शहर व जिल्ह्यात प्रचंड दहशत असलेला कुख्यात गुंड आणि वाळूमाफिया अप्पा ऊर्फ प्रकाश हरिभाऊ लोंढे याच्या खूनप्रकरणी पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने ५ जणांना अटक केली़ खुनाचा हा प्रकार पूर्ववैमनस्य व जमिनीच्या गैरव्यवहार यातून झाला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राम जाधव यांनी दिली.या प्रकरणी संतोष भीमराव शिंदे (वय ३४, रा. शिंदवणे. ता. हवेली), नीलेश खंडू सोलनकर (वय ३०, रा. डाळिंब, दत्तवाडी, ता. हवेली), राजेंद्र विजय गायकवाड (वय २४, रा. शिंदवणे, ता. हवेली), आकाश सुनील महाडिक (वय २०, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) व नितीन महादेव मोगल (वय २७, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़ चौकशीमध्ये त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.उरुळी कांचन येथे २८ मे रोजी सकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या अप्पा लोंढे याच्यावर त्याच्या घरापासून सुमारे दोनशे फूट अंतरावर ५ ते ६ हल्लेखोरांनी गोळ्या झाडून व धारदार हत्याराने डोके, गळा व चेहऱ्यावर वार करून निर्घृणपणे खून केला होता़ त्यानंतर हल्लेखोर फरार झाले होते.खून होताना प्रत्यक्षदर्शी कोणीही पाहिला नव्हता़ मात्र, संशयितांची माहिती पोलिसांना मिळाली होती़ त्यांच्या मागावर लोणी काळभोर पोलीस ठाण्याची २, तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची ३ अशी एकूण ५ पथके पाठविण्यात आली होती. या गुन्ह्यातील आरोपींना पाच दिवसांत जेरबंद करण्यात यशस्वी ठरलेल्या पोलीस पथकास पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे़ या पाच जणांना अटक केली असली, तरी अजून ३ ते ४ जणांचा यात सहभागाची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे़ या मागचा मास्टरमाइंडही वेगळाच असल्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे. (वार्ताहर)
अप्पा लोंढे खूनप्रकरणी ५ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2015 4:23 AM