इंदापूर : पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, तालुक्यातील दणकेबाज नेते आप्पासाहेब जगदाळे यांनी आज ( दि.१०) पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांनी सोबत येण्याचे निमंत्रण दिले आहे. कार्यकर्त्यासमवेत चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल असे जगदाळे यांनी सांगितले आहे. या संदर्भात लोकमत शी बोलताना जगदाळे म्हणाले की, मागील काळातच शरद पवार यांनी भेटीचे निमंत्रण दिले होते. मात्र घरात दु:खद प्रसंग घडला होता. त्यामुळे भेट घेता आली नव्हती. मात्र मागील महिन्यात आपण अजित पवार यांची ही भेट घेतली होती. आजच्या भेटीत शरद पवार यांच्याशी बराच वेळ चर्चा झाली. इंदापूर तालुका, बारामती लोकसभा मतदार संघातील विद्यमान परिस्थितीबाबत बोलणे झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या विभागणीनंतर विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे अजित पवारांच्या गटात गेले. गेल्या आठवड्यात शरद पवार गटातील विधानसभा निवडणुकीचे प्रबळ दावेदार प्रवीण माने देखील देवेंद्र फडणवीस यांचे चहापान करुन अजित पवार यांच्या गटात सहभागी झाले. त्यामुळे गेल्या दहा वर्षापासून विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असणा-या आप्पासाहेब जगदाळे यांना आत्ता मार्ग ख-या अर्थाने मोकळा झाला आहे. या संदर्भात विचारणा केल्यानंतर आपणास मार्ग नेहेमी मोकळाच होता. मी ज्या गोष्टी करतो त्या कधी चोरुन लपून करत नाही, असे ते म्हणाले.
आप्पासाहेब जगदाळे हे हर्षवर्धन पाटील यांचे मामा असले तरी त्यांच्यामध्ये अधूनमधून मतभेद होत असत. सन २०१९ च्या निवडणुकीआधी त्यांची दिलजमाई झाली होती. पाटील यांचा प्रचार करण्यात जगदाळे यांनी कसली ही कसर सोडली नव्हती. त्यामुळे हर्षवर्धन पाटील विजयाच्या उंबरठ्यापर्यंत आले होते. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या वेळी उमेदवारांच्या कारणावरून त्या दोघांचे परत बिनसले. अजित पवारांनी साथ दिली. बाजार समितीवर जगदाळे यांची सत्ता आली. आत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागणीनंतर चित्र बदलले आहे. अजित पवार, आ.दत्तात्रय भरणे, प्रदीप गारटकर, प्रवीण माने हे सारे बिनीचे शिलेदार आत्ता शरद पवारांसोबत नाहीत. मात्र कार्यकर्त्यांनी पवारांकडे जाण्यास सहमती दर्शवली तर आप्पासाहेब जगदाळे व त्यांच्या पाठोपाठ त्यांचे बंधू पंचायत समिती सदस्य प्रदीप जगदाळे यांच्यामुळेच शरद पवार यांची बाजू भक्कम होणार आहे. खा. सुप्रिया सुळे यांना समर्थ साथ मिळू शकणार आहे.