पुणे: कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणात आमदारसुनील टिंगरे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: पुणे पोलिसांनी टिंगरेंची चौकशी केल्याचे सांगितले. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनीदेखील याला दुजोरा दिला. मात्र, या अपघात प्रकरणात टिंगरेंवर कोणतीही कारवाई न झाल्याने अपघातात मृत्युमुखी पडलेले अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा यांच्या पालकांनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली. अनिशचे वडील लवकरच याप्रकरणी टिंगरे यांचा सहभाग नेमका कशासाठी होता, ते पहाटे ४ वाजता येरवडा पोलिस ठाण्यात कशासाठी आले, याचे उत्तर मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तसेच दोषारोपपत्रात टिंगरे यांचे नाव का नाही, असा संतप्त सवाल देखील या मुलांच्या पालकांनी उपस्थित केला.
कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर बाल न्याय मंडळाने बिल्डर विशाल अग्रवाल याच्या अल्पवयीन मुलाची लगेचच मुक्तता केली होती. त्याला ३०० शब्दांचा निबंध, वाहतूक पोलिसांबरोबर १५ दिवस काम करणे, तसेच दारू सोडवण्यासाठी उपचार घ्यावेत, अशा अटी आणि शर्तीवर जामीन मंजूर केला होता. या निकालानंतर देखील राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. १९ मे रोजी अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव पोर्शे कारने दिलेल्या धडकेत अनिश आणि अश्विनी यांचा मृत्यू झाला होता. मध्यरात्री अडीच वाजता घडलेल्या या प्रकारानंतर आमदारसुनील टिंगरेंनी मृत्युमुखी पडलेल्या युवक-युवतीकडे न जाता थेट पोलिस ठाण्यात धाव घेत पोलिस प्रशासनावर दबाव आणल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे.
पुणे पोलिसांनी याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या बापासह त्याची आई आणि आजोबा यांना अटक केली होती. आजही ही मंडळी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. पोलिसांनी या अपघातानंतर अल्पवयीन मुलाला मद्य विक्री करणारे पब मालक तेथील व्यवस्थापक, मुलाला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने बदलणारे डाॅ. अजय तावरे, डाॅ. श्रीहरी हाळनोर यांना देखील अटक करण्यात आली आहे.
आमच्या जिवाला तर धोका नाही ना...
मयत अनिश अवधिया याचे वडील ओमप्रकाश अवधिया यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना येत्या काही दिवसात मी शहरात येणार आहे. आमदार सुनील टिंगरे यांनी आमची कोणतीही मदत न करता, आरोपीच्या बचावासाठी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी नेमके पोलिस ठाण्यात काय केले, तेथील सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज करणार असल्याचे सांगितले. अपघातानंतर पोलिसांसह प्रशासनावर देखील मोठा दबाव होता. आम्ही पुणे शहरात दिवसाढवळ्या होणारे फायरिंग, कोयता गँग या बातम्या बघत असतो, त्यामुळे आमच्या जिवाला शहरात आल्यावर काही धोका तर होणार नाही ना? याची शंका असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या पक्षाने या प्रकरणानंतर त्यांना पुन्हा तिकीट देणे योग्य नाही असेही ते म्हणाले.
आमचा पोलिस आणि न्यायालयावर विश्वास..
अश्विनी कोष्टाचा भाऊ सोमप्रीत कोष्टा याने आमच्या आयुष्यात अत्यंत दुर्दैवी घटना घडली. आम्ही मुख्यमंत्री, पुणे पोलिस आयुक्त यांना भेटलो. टिंगरेंना तिकीट मिळाले कारण ते सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. त्यामुळे आम्हाला पोलिस आणि न्यायालयाने न्याय द्यावा हीच आमची मागणी असून, आमचा विश्वास न्यायप्रणालीवर असल्याचे मत व्यक्त केले.