पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, गुरूवारी द्विलक्षी अभ्यासक्रमाची पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. पहिल्या यादीतून २ हजार ४०८ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. त्यातही पहिला पसंतीक्रम मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १ हजार १०२ आहे.बायफोकलच्या एकूण ८ हजार ४९५ जागा असून, पहिल्या गुणवत्ता यादीसाठी ४ हजार ८७८ पात्र ठरले आहेत. इयत्ता अकरावी आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेनुसारच विज्ञान, वाणिज्य या शाखेत द्विलक्षी अभ्यासक्रमाचे प्रवेश दिले जाणार आहेत. पहिल्या पसंतीक्रमानुसार प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी २२ जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जावून आपला आॅनलाइन प्रवेश निश्चित करणे बंधनकारक आहे. प्रवेश न घेणारे विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी पात्र राहणार नाहीत. त्याचप्रमाणे पसंतीक्रम २ ते १० अॅलॉट झालेल्या विद्यार्थ्यांना सध्याचा प्रवेश मान्य असेल, तर त्यांनी दिलेल्या वेळेत आॅनलाइन प्रवेश घेणे आवश्यक आहे. मात्र, हे विद्यार्थी दुसऱ्या गुणवत्ता यादीसाठी पात्र असतील. एकदा प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द करू नये. प्रवेशाच्या वेळी सर्व कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेला नसेल त्यांनी बायफोकलच्या दुसºया फेरीची वाट पाहावी. वेळापत्रकानुसार पसंतीक्रम बदलावे, असे शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे स्पष्ट केले.
बायफोकलची प्रवेश यादी जाहीर, वेळेत प्रवेश घेण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 1:51 AM