कबड्डीप्रेमी, मित्रपरिवार सरसावला
बारामती : कर्नाटक राज्यातील विजापूर येथे तीन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातामध्ये राष्ट्रीय स्तरावर नावाजलेले इंदापूर तालुक्यातील दोन खेळाडू जागेवर मृत झाले. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या वैभव मोहिते व गणेश कोळी यांच्यावर विजापूर येथील बंजारा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. पुढील चांगल्या उपचारासाठी या दोघांना पुणे येथील खासगी रुग्णालयामध्ये शुक्रवारी (दि. १९) रात्री उशीरा दाखल करण्यात आले. मात्र घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कळंब येथील कबड्डीप्रेमी व खेळाडूंनी मदतीसाठी आवाहन केले आहे.
कळंब येथील महाराणा कबड्डी संघातील खेळाडूंच्या तवेरा गाडीला विजापूर येथे बुधवारी (दि. १७) पहाटे ५ च्या सुमारास अपघात झाला होता. या अपघातामध्ये महादेव आवटे (रा. भवानीनगर), सोहेल सय्यद (रा. कळंब) या दोघांचा मृत्यू झाला. कबड्डी खेळाच्या प्रेमापोटी हे खेळाडू अगदी शेतमजुरी करून उपजीविका करीत राष्ट्रीय पातळीपर्यंत नावाजले गेले होते. या अपघातामधून सुदैवाने बचावलेल्या मात्र गंभीर जखमी झालेल्या वैभव मोहिते व गणेश कोळी यांच्यावर दर्जेदार उपचार करण्यासाठी पुणे येथील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. वैभवचे वडील बापू मोहिते व गणेशचे वडील तानाजी कोळी यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. उपचाराचा खर्चदेखील मोठा असल्याने त्यांच्यावर संकट ओढावले आहे. या सर्वच खेळाडूंनी अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये यश संपादन केले आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. येथील महाराणा कबड्डी संघ राज्यात प्रसिध्द आहे.येथे कबड्डीसाठी अनेक विद्यार्थी येतात. या संघात अनेक राष्ट्रीय कबड्डीपट्टू घडले आहेत. अनेकजण कबड्डीच्या बळावर पोलीस भरती देखील झाले आहेत. अपघाताला तीन दिवस उलटले तरी कळंब परिसरावर अद्याप शोककळा आहे. या अपघातामध्ये एकूण नऊ खेळाडू होते. यातील दोघांचा मृत्यू झाला, तर किरकोळ जखमी असणाऱ्या सिद्धार्थ कांबळे, संदीप सूर्यवंशी, आाविष्कार कोळी, पृथ्वीराज शिंदे, समीर शेख यांना इंदापूर येथील खासगी रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या खेळाडूंच्या मदतीसाठी राष्ट्रीय कबड्डीपटू सुलतान डांगे, प्रशिक्षक अकबर शेख व त्याचा मित्र परिवार सरसावला आहे. कळंब येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयातील माजी विद्यार्थी देखील मदतीसाठी पुढे येत असून समाजमाध्यमातून मदतीसाठी आवाहन करण्यात येत आहे.
--------------------
चौकट
किरकोळ जखमी असणाऱ्या खेळाडूंना आम्ही इंदापूर येथील खासगी रूग्णालयात दाखल केले आहे. त्याचा जवळपास साडेतीन ते चार लाख रूपये खर्च झाला आहे. गंभीर जखमी असणाऱ्या वैभव व गणेश यांच्यावर विजापूरच्या हॉस्पिटलमध्ये पुढील चांगले उपचार मिळणे कठीण आहे. तसेच अंतर जास्त असल्याने गैरसोय होत होती. त्यामुळे पुणे येथील रूग्णालयात दाखल केले आहे. आवाहन केल्यानंतर मदतीचा ओघ सुरू झाला आहे. वैभव व गणेश सध्या बेशुद्ध अवस्थेत आहेत. त्यामुळे त्यांना तातडीने चांगले उपचार मिळणे गरजेचे आहे. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने मदतीसाठी आवाहन केले आहे.
- सुलतान डांगे
राष्ट्रीय कब्बडीपट्टू
-------------------------