पुणे : खरीप हंगाम २०२१ पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केले आहे. तालुका स्तरावरील शेतकऱ्यांकडून यासाठी अर्ज मागवण्यात येतात. स्पर्धेतील विजेत्यांसाठी रोख रकमेची बक्षिसे आहेत. तालुका स्तरावरील स्पर्धकांच्या पिकाच्या कापणीच्या वेळेस परीक्षक उपस्थित असतात.
तालुका स्तरावर सर्वाधिक उत्पादन झालेल्या ९ स्पर्धकांची नावे जिल्ह्यात जातात. तिथे सर्व तालुक्यातील स्पर्धकांमधून सर्वाधिक उत्पन्नाचे ६ जण निवडतात. ते विभागीय स्तरावर पाठवतात. विभागातील जास्त उत्पादनाचे पहिले तीन राज्य स्तरावर जातात. तिथे राज्याची तुलना होऊन राज्य स्तरावरील विजेते जाहीर होतात. त्यानंतर विभाग, जिल्हा व तालुका विजेते जाहीर केले जातात.
भात, ज्वारी, मका, बाजरी, नाचणी, तूर, मूग, उडीद व सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल अशा ११ पिकांसाठी स्वतंत्र स्पर्धा आहे. मूग व उडीद पिकासाठी ३१जुलै व अन्य पिकांना ३१ ऑगस्ट अंतिम मुदत आहे. पिकाखालील क्षेत्र किमान १००० हेक्टर असणे आवश्यक आहे. स्पर्धेचे अर्ज व अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी नजीकच्या तालुका कृषी कार्यालयाबरोबर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा तंत्र अधिकारी वर्षा यादव यांनी केले आहे.