पुणे: पुणे कोषागार कार्यालयातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या राज्य शासकीय सेवातून सेवानिवृत्त झालेले भा.प्र.से., भा.पो.से. आदी तसेच माजी आमदार यांच्यासह सर्व राज्य शासकीय सेवा निवृत्तीधारकांना आयकर सवलतीसाठी गुंतवणूकीची कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयाने केले आहे.
निवृत्तीवेतनधारकांचे 2021-22 या आर्थिक वर्षासाठी निवृत्तीवेतनाचे करपात्र उत्पन्न सर्व सवलती वगळता 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास आयकराची गणना होते. त्यामुळे करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांहून अधिक असल्यास त्यांनी आयकर कायदा 1961 चे कलम 80 सी, 80 सीसीसी, 80 डी, 80 जी नुसार गुंतवणूक, बचत केली असल्यास त्याची कागदपत्रे, सत्यप्रत तसेच पॅनकार्डची सत्यप्रत कोषागार कार्यालय पुणे येथे प्रत्यक्ष किंवा to.pune@zillamhakosh.in या ई-मेल पत्त्यावर मेलद्वारे 20 नोव्हेंबर 2021 अखेर सादर करण्याचे आवाहन केले आहे.
कागदपत्रे विहित मुदतीत सादर न केल्यास अप्पर कोषागार अधिकारी पुणे हे आयकर कायदा कलम 191 नुसार आहरण संवितरण अधिकारी म्हणून सन 2021-22 च्या आयकराची कपात पात्र निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्तीवेतनातून हप्त्यांमध्ये करतील, असे वरिष्ठ कोषागार अधिकाऱ्यांनी कळवले आहे.