येडगाव : येडगाव धरणबांधणीनंतर येडगाव धरणातील पाण्याने गेल्या ४४ वर्षांत पहिल्यांदाच तळ गाठल्याने जुन्या गावातील म्हणजेच धरणबांधणीच्या आधीचे येडगावचे अवशेष दिसत आहेत. आतापर्यंत मागील काही वर्षांत अनेक वेळा पाण्याची पातळी खाली गेली होती; परंतु सध्याची परिस्थिती मात्र अत्यंत भीषण आहे. येडगाव हे धरणग्रस्त गाव असून, १९७६ मध्ये धरणबांधणीच्यावेळी गावातील शाळा, पाण्याचे आड, मंदिरे, जुने वाडे, घरे, मशीद साºया वास्तू पाण्याखाली गेल्या होत्या. येडगावातील नवीन पिढीला या गावाची माहिती सांगण्यासाठी पुढाकार घेतला. अवशेषांचे चित्रीकरण करून त्याद्वारे जुन्या गावाची माहिती सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. याप्रसंगी अनेक जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला, त्या काळची भौगोलिक, आर्थिक, शैक्षणिक परिस्थिती संदर्भात अनेक जुन्या आठवणी ज्येष्ठांकडून तरुणांना सांगण्यात आल्या. तसेच धरणबांधणीला करण्यात आलेला प्रचंड विरोध व त्या वेळी झालेला गदारोळदेखील सर्वांना स्मरण झाला. यावेळी येडगावचे माजी सरपंच गुलाबराव नेहरकर, देविदास भोर, गणेश गावडे, प्रकाश नेहरकर, शिवाजी शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.......येडगाव धरणात गेलेला पाण्याचा आड ४४ वर्षांनंतर अजूनही त्याच अवस्थेत आहे. आज ४४ वर्षांनंतर पहिल्यांदाच पाण्याची पातळी खालावली असल्याने सर्व वास्तूंचे अवशेष स्पष्ट दिसत आहेत. अनेक वर्षांपूर्वीचे वड, पिंपळ या वृक्षांचे अवशेष अजूनही तग धरून आहेत. ..............
तलावात बुडालेल्या गावाचे ४४ वर्षांनी दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 1:11 PM
गेल्या ४४ वर्षांत पहिल्यांदाच तळ गाठल्याने जुन्या गावातील म्हणजेच धरणबांधणीच्या आधीचे येडगावचे अवशेष दिसत आहेत
ठळक मुद्देधरणातील पाणी पातळी खालावली : जुन्या आठवणींना उजाळा, तरुणांची गर्दीअवशेषांचे चित्रीकरण करून त्याद्वारे जुन्या गावाची माहिती सोशल मीडियावरही व्हायरल