एचएएमआरएलच्या सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या परिसराच्या जागेत राजरोसपणे राडारोडा, कचरा टाकला जातो. यामुळे परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. महामार्गालगतच हा कचरा टाकला जात असल्याने महामार्गालगतच्या सर्विस रस्त्यांना कचराकुंडीचे स्वरूप आले आहे.
पाषाण, सुतारवाडी, बाणेर, बावधन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामांचा राडारोडा निर्माण होतो. परिसरात अनधिकृत हॉटेलची संख्या वाढल्याने या हॉटेलमधील कचरा महामार्गालगत टाकण्यात येतो. कचऱ्याची दुर्गंधीचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. महामार्गालगत टाकण्यात आलेला कचरा अनेकदा रस्त्यावर येत असल्याने वाहन चालवताना देखील कसरत करत वाहने चालवावी लागतात.
या परिसरातील नैसर्गिक जलस्रोतदेखील या कचऱ्यामुळे बाधित झाले असून, ओढ्याचे पात्रदेखील बुजवले गेले आहे. पर्यावरण दृष्टिकोनातून पक्ष्यांसाठी महत्त्वपूर्ण समजला जाणारा पाषाण तलावदेखील या कचऱ्यामुळे बाधित होत असून महामार्गावरील कचरा पाषाण तलावाच्या परिसरात देखील जात असल्याने या परिसरातील पर्यावरणाचा प्रश्न देखील गंभीर होत चालला आहे.
पाषाण तलाव व महामार्गालगत टाकण्यात आलेला कचरा त्वरित उचलण्यात यावा तसेच कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. तसेच या परिसरातील अवैध राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी या परिसरात पालिकेच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणी पर्यावरणप्रेमी नागरिक करत आहेत.