औंध : पुणे महापालिका निवडणुकीसाठी औंध-बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मध्ये ४६.६४ टक्के व बाणेर-बालेवाडी-पाषाण प्रभाग ९ मध्ये ५५.९ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. बोगस मतदानाच्या संशयावरून बाणेरमध्ये राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, गाड्यांची तोडफोड, दगडफेक झाली. घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला व राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दुपारी घडलेल्या या घटनेमुळे बाणेर व बालेवाडीत तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. शहरातील १४५ संवेदनशील केंद्रांपैकी ५७ मतदान केंद्रे ही बाणेर-बालेवाडी प्रभागात असल्याने सर्वांचे लक्ष येथील मतदान प्रक्रियेकडे लागले होते. मात्र, मतदारांनी मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. भिकाबाई अनंतराव किरवे (वय १०१) यांनी आज (मंगळवार) आपला मतदानाचा हक्क बजावला. भिकाबाई किरवे या औंध येथील रहिवाशी आहे. पुणे महापालिका निवडणूक औंध-बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधून त्यांनी मतदान केले.किरवे यांनी वयाच्या १०१ व्या वर्षी देखील मतदानाचा हक्क बजावत युवकांना प्रेरणा देण्याचे काम केले आहे. तसेच मतदान दिवस सुट्टी म्हणून साजरा करणाऱ्यांनाही एक चपराकच म्हणावी लागेल. भिकाबाई किरवे यांची मतदार म्हणून ही १६ वी निवडणूक आहे. नंतर मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने बाणेर, बालेवाडी, बोपोडी भागातील २५ ते ३० मतदान केंद्रावर गर्दी झाली होती. मतदान करण्याची वेळ सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत होती. मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. त्यामुळे काही मतदान केंद्रांवर रात्री ९ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. उंड्री : उंड्री - वडकी पंचायत समिती गण क्रमांक ८६ साठी ६२% टक्के मतदान झाले. या गणात एकूण २७, ६२२ मतदारापैकी सुमारे १७, ०९० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क यावेळी बजावला. या गणात चौरंगी लढत आहे. भाजपाचे मोहन कामठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन घुले, काँग्रेसचे संदीप बांदल, शिवसेनेचे संदीप मोडक यांच्यात चुरशीची चौरंगी लढत आहे.
आले पोलीस छावणीचे स्वरूप
By admin | Published: February 22, 2017 3:08 AM