लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागला. मात्र, जीवनशैलीत पारंपरिक पद्धतीचा आहार, नियमित व्यायाम व योग, आवश्यक झोप, विश्रांती या बाबीचा अवलंब जीवनशैलीत केल्यामुळे ८८ टक्के लोकांमध्ये कोणत्याही नवीन स्वरुपाचा आजार जाणवला नसल्याचे एका सर्वेक्षणात समोर आले आहे.
विश्वानंद केंद्राच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य नागरिकांच्या मानसिक व शारिरीक आरोग्यावर झालेल्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. ऑनलाईन पद्धतीने केलेल्या सर्वेक्षणात सहकारनगर, कात्रज, बिबवेवाडी, सातारा रस्ता, धनकवडी, कोंढवा यांसह शहराच्या विविध भागांतील सुमारे ४०० नागरिकांचा सहभाग होता.
सर्वेक्षणामध्ये सहभागींपैकी १२ टक्के लोकांना नवीन स्वरूपाचे आजार किंवा लक्षणे जाणवली. त्यांनी आयुर्वेदातील सुंठ, मिरे, गवती चहा, पुदिना अशा पदार्थांचा वापर करण्यास प्राधान्य दिले. केंद्रामधील अधिकारी वैद्य अजित मंडलेचा, वैद्य गौस मुजावर यांच्या निरीक्षणाखाली सर्वेक्षण व संशोधनाचे काम पूर्ण केले. याकरीता वैद्य मनोज ठाकूर, वैद्य सर्वेश कुलकर्णी, डॉ.दीपक फाल्गुने, डॉ. एम.जी. सय्यद यांनी मार्गदर्शन केले.
---
कोरोनाच्या काळात अनेकांची जीवनशैली बदलेली दिसून आली. योग्य आहार, नियमित व्यायाम व योग, मानसिक ताणाचे नियोजन आणि योग्य प्रमाणात झोप अशा बाबींचा दैनंदिन जीवनात समावेश असेल तर चिरकाळ निरोगी राहता येते असा निष्कर्ष निघाला.
- वैद्य गौस मुजावर