पुणे, दि. २५ - राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी पुणे जिल्हातून २ लाख ९८हजार ५६ शेतक-यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यात इंदापूर तालुक्यातून सर्वाधिक ३४ हजार ७८७ ,शिरुरमधून ३४ हजार ३८८ तर बारामतीतून ३३ हजार ७७६ शेतक-यांनी अर्ज केले आहेत. तसेच जिल्ह्यातील २४ हजार ९९५ शेतक-यांनी आधारकार्डाची माहिती किंवा आधारकार्ड दिले नसल्याचे समोर आले आहे.
शेतकरी कर्ज माफीसाठी अर्ज करणा-या शेतक-यांची तालुकानिहाय माहिती प्राप्त झाली असून त्यात इंदापूर जिल्हा प्रथम,शिरुर दुस-या तर बारामती तिस-या क्रमांकावर आहे. अधिकाधिक शेतकरी बांधवांना दिवाळीपूर्वी कर्ज माफीचा लाभ देण्याच्या दृष्टीने जिल्हाधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभाग,ग्रामविकास विभाग व कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच पुणे जिल्हा मध्यवर्धी सहकारी बँक व राष्ट्रियकृत बँकांची सर्व यंत्रणा कार्यरत राहणार आहे.
कर्ज माफीसाठी अर्जाबरोबरच आधारकार्ड लिंक करणे आवश्यक होते. मात्र,जिल्ह्यातील तब्बल २५ हजार शेतक-यांनी आधारकार्ड लिंक केलेले नाही. त्यामुळे या शेतक-यांना कर्जमाफीच्या लाभापासून सध्या बाजूला ठेवले जाणार आहे. तसेच जिल्ह्यातून 3 कोटी ४० हजार शेतक-यांना कर्ज माफीचा लाभ मिळू शकतो, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून शासनाला सादर केली होती. मात्र, शासनाला ३० जून २०१७ पर्यंतच्या लाभार्थी शेतक-यांची माहिती शासनास सादर करण्यात आली होती. परंतु,शासनाने ३० जून २०१६ ही मर्यादा ठेवल्याने पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील तब्बल ८० हजार शेतकरी या कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार आहेत,असे अधिका-यांनी सांगितले.
शासनातर्फे येत्या २ आॅक्टोबरपूर्वी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती / चावडीच्या ठिकाणी ,तलाठी,ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांच्या मदतीने आॅनलाईन अर्ज केलेल्या शेतक-यांच्या नावाचे ‘चावडी वाचन’करण्यात येणार आहे.या चावडी वाचनाच्या अनुषंगाने सर्व संबंधित यंत्रणेमधील अधिका-यांचे प्रशिक्षण सर्व तालुक्यांमध्ये तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालिका कृषी अधिकारी,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभागीय अधिकारी व तालुका सहाय्यक निबंधक यांचे मार्फत करण्यात येणार आहे.
चावडी वाचनाच्या कार्यक्रमाची वेळापत्रके संबंधित तालुका स्तरावर करण्यात येणार आहेत.या चावडी वाचनात उपस्थितांना यादी मधील नावांबाबत काही अक्षेप असल्यास त्यांनी लेखी व त्याबाबतचा पुरावा संबंधित कर्मचा-यांना त्वरित द्यावा किंवा तीन दिवसात संबंधित तालुका सहाय्यक निबंधक कार्यालायात जमा करावा,असे जिल्हा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.अर्ज करणा-या शेतक-यांची तालिका निहाय माहिती
तालुका अर्ज संख्या
आंबेगाव २०,३६९
बारामती ३३,७७६
भोर ११,७६९
दौंड २७,६३४
हवेली १९,७५५
इंदापूर ३४,७८७
जुन्नर २७,५४९
खेड ३१,१२२
मावळ १०,९००
मुळशी ५,६६८
पुणे शहर १६,२४५
पुरंदर १९,८५१
शिरुर ३४,३८८
वेल्हा ४,२०९
---------------------------------
एकूण २,९८,०२२ (इतर ३४)