पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना उमेदवारीअर्ज आणि शपथपत्र महाआॅनलाइनच्या मदतीने भरण्याची सक्ती केली आहे. आॅनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून, अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे जमा करावा लागणार आहे. आॅनलाइन भरलेला आणि स्वाक्षरी केलेला अर्जच उमेदवारीअर्ज म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. मालमत्ता आणि दायित्व, गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबतचे शपथपत्र स्टॅम्प पेपरवर सादर करण्यापासून उमेदवारांना सूट दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांच्या निवडणुकांची तयारी केली आहे. यंदा पहिल्यांदाच उमेदवारीअर्ज भरण्याच्या प्रक्रियेचे संगणकीकरण केले आहे. उमेदवारांना उमेदवारी अर्ज सादर करताना अर्ज, मत्ता आणि दायित्व तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबतचे शपथपत्र, प्रमाणपत्रांच्या सत्यप्रती, अधिकृत पक्षीय एबी फॉर्म आणि जातदाखला, जात पडताळणी दाखला जोडावा लागतो. संगणकीकरणाच्या धोरणामुळे निवडणूक आयोगाने महाआॅनलाइनच्या मदतीने एक सॉफ्टवेअर तयार केले आहे. या सॉफ्टवेअरद्वारेच उमेदवारांना उमेदवारी अर्ज आणि शपथपत्रे भरावी लागणार आहेत. आयोगाच्या संकेतस्थळावर संपूर्ण अर्ज भरावा लागेल. (प्रतिनिधी)
उमेदवारी अर्ज आता होणार आॅनलाइन
By admin | Published: January 05, 2017 3:14 AM