पुणे : आरटीई कायद्यातील जुन्या नियमावलीनुसार खाजगी शाळांमधील रिक्त जागांवर प्रवेश मिळावा, यासाठी प्रवेश अर्ज करण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे मुदतवाढ देण्यात आली आहे. पालकांना ४ जूनपर्यंत आरटीई पाेर्टलवर ऑनलाईन माध्यमातून प्रवेश अर्ज करता येणार आहेत.
राज्य शासनाने आरटीई कायद्यात केलेल्या बदलांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. शिक्षण विभागाने आरटीईच्या जुन्या नियमावलीनुसार खाजगी शाळांमधील रिक्त २५ टक्के जागांची माहिती आरटीई पाेर्टलवर अद्ययावत केली. तसेच, नव्याने ऑनलाईन माध्यमातून अर्ज स्वीकारण्यासाठी १७ ते ३१ मे या कालावधीत मुदत दिली हाेती. पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आणखी काही दिवस मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी केली जात हाेती. त्यानुसार शिक्षण संचालनालयाकडून अर्ज करण्यासाठी चार दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे. पालकांना https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावरून प्रवेश अर्ज करता येणार आहेत.
रिक्त जागांच्या दुप्पट अर्ज प्राप्त
राज्यातील ९ हजार १९७ शाळांमध्ये १ लाख ४ हजार ७३५ जागा रिक्त आहेत. दि. ३१ मे राेजी रात्री ८ वाजेपर्यंत आरटीई अंतर्गत खाजगी शाळांतील रिक्त जागांच्या दुप्पट २ लाख ३० हजार अर्ज प्राप्त झाले हाेते. पालकांचा प्रतिसाद पाहता त्यामध्ये आणखी भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाॅटरीच्या माध्यमातून शाळांतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.
आरटीईअंतर्गत खाजगी शाळांमध्ये रीक्त असलेल्या जागांवर प्रवेशासाठी ४ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, त्यानंतर काेणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही.
- शरद गाेसावी, शिक्षण संचालक, प्राथमिक