पुणे : महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या पाच जागांसाठी मंगळवारी अत्यंत नाट्यमय घडामोडीमध्ये भाजपा, राष्ट्रवादी काँगे्रस, काँगे्रस आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने एका जागेसाठी सुभाष जगताप आणि रूपाली चाकणकर यांचा अर्ज दाखल केला; परंतु यांमध्ये आवश्यक कागदपत्रे वेळ संपल्यावर दाखल केल्याने चाकणकरांची उमेदवारी अडचणीत आली आहे. शिवसेना-काँगे्रेसचे संख्याबळ समान असल्याने यापैकी एकाच पक्षाच्या उमेदवाराला चिठ्ठीवर संधी मिळणार आहे. स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपाच्या वाट्याला तीन जागा असल्याने गोपाळ चिंतल, गणेश बीडकर आणि रघुनाथ गौडा यांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँगे्रसला एक जागा मिळणार आहे. यासाठी पक्षाच्या वतीने माजी सभागृह नेते सुभाष जगताप व महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये दोघांपैकी एकाला संधी मिळणार आहे. यामध्ये चाकणकर यांनी अर्जांसोबत आवश्यक असलेली कागदपत्रे ४ वाजल्यानंतर दाखल केली. महापालिकेत झालेल्या हणामारीमुळे कागदपत्र दाखल करण्यासाठी उशीर झाल्याचे चाकणकर यांनी सांगितले. परंतु, पुरेशी कागदपत्रे नसल्याने त्यांची उमेदवारी अडचणीत आली आहे. याबाबत बुधवारी सकाळी सुनावणी होणार आहे. यामुळे मात्र जगताप यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला असल्याची चर्चा आहे. शिवसेनेच्या वतीने माजी नगरसेवक योगेश मोकाटे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनी मंगळवारी अर्ज दाखल केला. तर, काँगे्रसच्या अजित दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँँगे्रस-शिवसेनेपैकी एकालाच संधी मिळणार असून, याबाबत बुधवारी सकाळी ११ वाजता प्रभारी आयुक्त राजेंद्र जगताप यांच्या कार्यालयात चिठ्ठी काढून एक नाव अंतिम केले जाणार आहे. त्यानंतर २४ एप्रिल रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत पाचही स्वीकृत नगरसेवकांच्या नावांवर शिक्कामोर्तब केला जाणार आहे.मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर यादीत बदलस्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपाकडून गणेश घोष, गोपाळ चिंतल व रघुनाथ गौडा ही ३ नावे निश्चित केली होती. त्यामुळे कुटुंबासह तिघेही अर्ज भरण्याकरिता दुपारी पालिकेते आले होते; मात्र ऐनवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून, गणेश घोष यांच्याऐवजी गणेश बीडकर यांना स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज भरण्यास सांगिले. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांचा मोठा उद्रेक झाला.या प्रकारामुळे पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. पक्षातील पुण्याच्या नेत्यांचे प्रस्थ वाढू नये म्हणून बीडकर यांना जाणीवपूर्वक संधी देण्यात आल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीत पराभूत झालेल्यांना स्वीकृत नगरसेवक पदासाठी संधी दिली जाणार नाही, असे पक्षाचे धोरण भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी जाहीर केले होते. मात्र, या धोरणाला मुरड घालून पालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या गणेश बीडकर यांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी देण्यात आल्याने कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
स्वीकृत नगरसेवकांसाठी अर्ज दाखल
By admin | Published: April 19, 2017 4:27 AM