पुणे : महापालिकेच्या महत्वाकांक्षी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय प्रत्यक्ष साकारण्याच्यादृष्टीने सकारात्मक पाऊल पडले असून महाविद्यालयाच्या मान्यतेचा अर्ज मुंबईत वैद्यकीय शिक्षक संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, अतिरिक्त आयुक्त (जनरल) रुबल अग्रवाल, आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, सहायक आरोग्यप्रमुख, अंजली साबणे उपस्थित होत्या. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमितजी देशमुख यांच्याकडे हा अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती महापौर मोहोळ यांनी दिली. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स, नाशिक यांच्याकडे शुक्रवारी हा अर्ज दाखल करण्यात येणार आहे. महाविद्यालयाची प्रक्रिया निर्णयाक स्थितीमध्ये आली आहे.गुजरातमधील अहमदाबाद महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या धर्तीवर पुणे महापालिकेचा न्यास (ट्रस्ट) स्थापन करण्यात येणार आहे. या न्यासाच्या माध्यमातून महाविद्यालय उभे करण्याचा ठराव स्थायी समितीसह मुख्य सभेत मंजूर झालेला आहे. राज्य शासनाणेही त्याला मान्यता दिलेली आहे. धर्मादाय आयुक्तांच्या माध्यमातून न्यास नोंदणी करून दोन्ही नोंदीचे पत्र पालिकेला प्राप्त झालेले आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाचा 'मास्टर प्लॅन' तयार करण्यात आला असून त्याला पालिकेच्या बांधकाम विभागाकडून मान्यता देण्यात आलेली आहे.लवकरच केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि एमसीआयची मान्यतेची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. तत्पूर्वी डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन आणि महाराष्ट्र युनिव्हर्सिटी हेल्थ सायन्स, नाशिक यांच्याकडून एक पथक पाहणीसाठी पुण्यात येणार आहे. त्यांचा अहवाल सादर झाल्यानंतर केंद्राकडे हा प्रकल्प जाईल. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि एमसीआयची मान्यता झाल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळणार आहे. ----------स्थायी समितीचा अध्यक्ष असताना पुणे महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय व्हावे ही संकल्पना मांडली होती. भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने महाविद्यालय सुरू करण्यात यावे अशी कल्पना आणि दरवर्षी त्याप्रमाणे अंदाजपत्रकात तरतूदही करण्यात आली. वैद्यकीय महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षाची १०० जागांच्या प्रवेशाची क्षमता पूर्ण करण्याचे शंभर टक्के प्रयत्न करण्यात येणार आहेत. पुढच्या पाच वर्षांच्या काळामध्ये मान्यता मिळाल्यानंतर पुढील पाच वर्षात टप्प्याटप्प्याने ५०० खाटांचे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल, वसतीगृह, प्रयोगशाळेचे बांधकामे टप्प्याटप्प्याने केले जाणार आहेत.- मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे
'भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय' साकारण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 12:32 PM
महाविद्यालयाच्या मान्यतेचा अर्ज मुंबईत वैद्यकीय शिक्षक संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडे सुपूर्द
ठळक मुद्देमहाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स, नाशिककडेही होणार अर्ज दाखल