लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्यात आरटीई प्रवेशाच्या एकूण ९६ हजार ६२९ जागा असून या जागांसाठी एकूण ७९ हजार २४६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. अनेक जिल्ह्यांत जागा अधिक असल्या तरी अर्ज कमी आले आहेत. पुण्यात मात्र अवघ्या पाच दिवसांतच उपलब्ध जागांपेक्षा अधिक अर्ज आले. पुण्यात १४ हजार ७७३ जागांसाठी आत्तापर्यंत २२ हजार ६६२ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले असून, त्यात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठी राबविल्या जात असलेल्या ऑनलाइन आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी ३ मार्चपासून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली. कोरोनामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवावा, असा प्रश्न पालकांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे आरटीई प्रवेशाअंतर्गत आपल्या पाल्याचे शिक्षण पूर्ण करण्याचा पर्याय अनेक पालकांनी स्वीकारला असल्याचे बोलले जात आहे. कोरोनामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. या शाळांमध्ये प्रवेशित झालेल्या विद्यार्थी संख्येच्या २५ टक्के जागांवर आरटीई अंतर्गत प्रवेश दिला जातो. यात मुंबई महानगर प्रदेशाचा विचार करता मुंबईत ५२२९ इतक्या जागा असून ४६३२ अर्ज आले. तर पालघरमध्ये ४२७३, रायगड ४२३६ तर ठाणे जिल्ह्यात १२०७४ अर्ज असून येथे अनुक्रमे ४४१, ३३३१, ६५६६ जणांनी अर्ज केले. तर रत्नागिरीत ८६४ जागा असून २६६ अर्ज आले. तर सिंधुदुर्गमध्ये ३४५ जागांसाठी ४५ अर्ज आले आहेत.