लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातीर्फे २०२१ मध्ये घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी येत्या २३ डिसेंबरपासून ऑनलाईन पध्दतीने परीक्षा अर्ज भरता येणार आहेत. दरवर्षी सर्वसाधारणपणे मार्च महिन्यात दहावीची परीक्षा घेतली जाते. परंतु, कोरोनामुळे यंदा मार्च महिन्यात परीक्षा घेणे शक्य नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदा एप्रिल-मे २०२१ महिन्यात परीक्षा होण्याची शक्यता राज्य मंडळाने व्यक्त केली आहे.
कोरोनामुळे मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जुलै २०२० मध्ये जाहीर करण्यात आला. त्यानंतर आता २०२१ मध्ये इयत्ता दहावीची परीक्षा कधी होणार याची विद्यार्थी-पालकांमध्ये उत्सुकता होती. नियमित विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज येत्या २३ डिसेंबर ते ११ जानेवारी २०२१ या कालावधीत नियमित शुल्कासह सरल डाटाबेस वरून ऑनलाईन पध्दतीने स्वीकारणार असल्याचे मंडळाने सांगितले आहे.
माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर आरोग्याच्या दृष्टीने शासनाने वेळोवेळी प्रसिध्द केलेल्या नियम व अटींचे पालन करावे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीनेच आपल्या माध्यमिक शाळांमार्फत परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरावा, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे. तसेच मार्च २०२० अथवा नोव्हेंबर-डिसेंबर २०२० मधील परीक्षेत एकाचवेळी सर्व विषय घेवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच २०२१ मधील परीक्षेस श्रेणीसुधार योजनेंतर्गत अर्ज भरून परीक्षा देता येईल, असेही राज्य मंडळाने सांगितले आहे.
चौकट
१७ नंबरचा अर्ज आत्ता भरू नये
नव्याने १७ नंबरचा अर्ज भरून नोंदणी करणाऱ्या खासगी विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे अर्ज भरण्यााचा कालावधी स्वतंत्रपणे कळविला जाणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी सध्या अर्ज भरू नयेत, असे राज्य मंडळातर्फे सांगण्यात आले आहे.