पुणे : राज्य शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीच्या जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये आयाेजित केलेल्या पुरवणी परीक्षेसाठी येत्या २७ फेब्रुवारीपासून अर्जास सुरूवात हाेणार आहे. विद्यार्थ्यांना संकेतस्थळावरून ऑनलाईन माध्यमातून नियमित शुल्कासह दि ७ जून पर्यंत अर्ज करता येणार आहे.
बारावी फेब्रुवारी - मार्च २०२४ परीक्षेचा निकाल दि. २१ मे राेजी ऑनलाईन जाहीर झाला. परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी, तसेच कमी गुण पडलेल्या विद्यार्थ्यांना श्रेणीसुधार साठी पुन्हा परीक्षेची संधी दिली जाते. त्यासाठी राज्य मंडळाकडून बारावी पुरवणी परीक्षेचे जुलै- ऑगस्ट २०२४ आयाेजन करण्यात आले आहे. बारावी परीक्षेस पुनर्परिक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी, आयटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्रे स्विकारण्यात येणार आहेत.
श्रेणी सुधारसाठी दाेन संधी
पुरवणी परीक्षेसाठी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर अर्ज भरता येईल. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना श्रेणीसुधारसाठी जुलै- ऑगस्ट २०२४ व फेब्रु - मार्च २०२५ अशा दोनच संधी मिळणार आहेत.
पुरवणी परीक्षेच्या महत्वाच्या तारखा
अर्ज प्रक्रियेला दि. २७ पासून सुरूवात हाेणार असून नियमित शुल्कासह दि. ७ जूनपर्यंत अर्ज करता येईल. त्यानंतर दि. ८ ते १२ जून या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरावा लागणार आहे. आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठी दि. ३१ मे ते १५ जून पर्यंत मुदत दिली आहे. यासह दि. १८ जून पर्यंत उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करायच्या आहेत.