लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “तंत्रज्ञानातील बदल झपाट्याने होत आहेत. या स्थित्यंतराशी जुळवून घेण्यासाठी सातत्याने संशोधन होणे आवश्यक आहे. त्यामुळे औद्योगिक आणि शैक्षणिक संस्थातील भागीदारी अतिशय महत्त्वाची आहे. या दोन संस्थांच्या सहयोगाने संशोधनाला चालना मिळेल आणि अनेक नवीन तंत्रज्ञान विकसित होतील,” असे प्रतिपादन इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअर्सच्या (आयईईई) एशिया-पॅसिफिक रिजनचे संचालक दीपक माथूर यांनी केले.
‘आयईईई’ बॉम्बे सेक्शन, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लोणावळा आणि सिद्धांत ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तंत्रज्ञानातील स्थित्यंतरावरील सहाव्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन शुक्रवारी झाले. परिषदेचे प्रमुख डॉ. चाणक्य कुमार झा, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे वैज्ञानिक अधिकारी डॉ. बी. सत्यनारायणा, ‘आयईईई रीजन-१०’चे संचालक डॉ. लान्स सी फंग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य राजेश पांडे, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, पुणे अकॅडमी ऑफ ऍडवान्सड स्टडीजचे चेअरमन डॉ. श्रीपाद ढेकणे आदी यावेळी उपस्थित होते. चार एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या आंतरराष्ट्रीय परिषदेत ३१ देशांतुन १०५० संशोधन प्रबंध सादर होतील. जगभरातून ७ हजारांपेक्षा जास्त लोक या परिषदेत सहभागी झाले आहेत. रश्मी यादव यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.