पुणे : मालाडमधील गावठी दारू प्यायल्यामुळे शेकडो जणांचा बळी गेल्यानंतर राज्यभरात गावठी दारू बंद करण्यासाठी पोलिसांकडून धडक मोहीम सुरू आहे. पुण्यातील जनता वसाहत आणि दत्तवाडी परिसरात मात्र या गावठी दारूचा महापूर आला आहे. विशेष म्हणजे या दारू विक्रेत्यांविरोधात कोणी दत्तवाडी पोलिसांमध्ये तक्रार देण्यासाठी गेले, तर आधी नावासह लेखी तक्रार द्या; मग कारवाईचं बघू, अशी भूमिका पोलिसांकडून घेतली जात आहे. त्यामुळे शहरात गावठी दारूविक्रेत्यांना पोलिसांचाच वरदहस्त असल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून, कुंपणच शेत खात असेल तर सांगणार कोणाला, असा सवाल नागरिक विचारत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागालगत असलेल्या आणि पर्वती टेकडीच्या उतारावर असलेल्या जनता वसाहत, दत्तवाडी तसेच दांडेकर पुलाच्या भर रस्त्यावर गावठी दारूची राजरोस विक्री होत आहे. त्यात मांगीरबाबा चौकात एसबीआय बँकेच्या मागील ओढा, पु. ल. देशपांडे उद्यानाजवळील ट्रान्झिट कॅम्पचा परिसर, स्वामी विवेकानंद मठाच्या समोर, गोल्डन व्हील हॉटेलच्या मागील बाजूस, सिंहगड रस्ता सुरू होतो त्या ठिकाणी ही दारूविक्री फुगे तसेच प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये विक्री सुरू आहे. विशेष म्हणजे ज्या रामकृष्ण मठाच्या भिंतीसमोर ही दारूविक्री केली जाते, त्यापासून अवघ्या काही अंतरावर वाहतूक पोलिसांचा दहा ते बारा कर्मचाऱ्यांचा ताफा असलेली एक व्हॅनही दिवसभर उभी असते. मात्र, या विक्रेत्यांना त्याचाही धाक उरला नसल्याने भरदिवसा फुगे, प्लास्टिकच्या पिशव्या तसेच नारळामध्ये ही दारूविक्री केली जात आहे. मागील महिन्यात मालाड येथे विषारी गावठी दारू प्यायल्यानंतर शेकडो जणांचा बळी गेला. त्यानंतर जागे झालेल्या सरकारने बेकायदा गावठी दारूविक्रेत्यांचे कंबरडे मोडून काढण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मुळातच गावठी दारूची निर्मिती आणि विक्री ही बेकायदाच असल्याने पोलिसांना त्याच्यावर कारवाई करण्यासाठी कोणाच्याही तक्रारीची अथवा आदेशाची गरज नाही. अशी विक्री होत असल्याची माहिती मिळताच त्यांच्याकडून कारवाई होणे अपेक्षित आहे. काही दिवसांपूर्वी जनता वसाहत परिसरात अशा बेकायदा विक्रेत्यांमुळे सामाजिक समस्या निर्माण होत असल्याने या परिसरातील काही लोकप्रतिनिधी तसेच नागरिक दत्तवाडी पोलीस ठाण्यात गेले होते. या वेळी या नागरिकांकडून पोलिसांना गावठी दारूविक्रेत्यांची माहिती देण्यात आली. मात्र, गावठी दारूबाबत काही तक्रार असल्यास नावासह लेखी तक्रार द्या, त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करू, असे पोलिसांनी या लोकप्रतिनिधींना सुनावले. त्यामुळे नावासह अर्ज दिल्यास तक्रार कोणी केली, हे पोलिसांकडून संबंधित विक्रेत्यांना सांगितले गेल्यास जिवावर बेतण्याची शक्यता असल्याने तक्रार न देताच नागरिकांना मागे फिरावे लागले. यापूर्वीही अशाच तक्रारी केल्यानंतर त्यांना या दारूविक्रेत्यांकडून धमक्या आल्याचे प्रकार घडले आहेत.
अर्ज द्या, मग दारूवर कारवाईचं बघू!
By admin | Published: July 23, 2015 4:37 AM