पुणे : राज्यातील खासगी विद्यापीठांच्या प्रीमिनेंट एज्युकेशन अॅण्ड रिसर्च असाेसिएशन ‘पेरा’ च्या संघटनेच्या वतीने येत्या २५ ते २७ या कालावधीत ऑनलाईन सीईटी परीक्षेचे आयाेजन करण्यात आले आहे. खासगी विद्यापीठातील पदवी आणि पदव्युत्तर पदवी विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा महत्वाची आहे. परीक्षेचा निकाल २ जून राेजी जाहीर केला जाणार आहे.
श्री बालाजी युनिर्व्हसिटीचे कुलगुरू जी.के. शिरूडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी एमआयटी, डब्ल्यूपीयू चे कुलगुरू आर.एम. चिटणीस, डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी, आंबी, पुणे च्या कुलगुरू सायली गणकर, डाॅ. पी.ए. इनामदार युनिव्हर्सिटीचे कुलगुरू एम.डी.लाॅरेन्स आदी उपस्थित हाेते.
राज्यातील विविध २० खासगी विद्यापीठामधील इंजिनिअरिंग, बायाेइंजिनिअरिंग, मरीन इंजिनिअरिंग, डिझाईन, फाईन आर्टस, फूड टेक्नाॅलाॅजी, फार्मसी, मॅनेजमेंट, अर्किटेक्चर, लाॅ आणि हाॅटेल मॅनेजमेंट या व्यावसायिक काेर्सेसच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घ्यायचा असेल तर पेरा सीईटी परीक्षा देणे अनिवार्य आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही पेरा-सीईटी ऑनलाईन माध्यमातून घेण्यात येणार आहे. येत्या २० मे पर्यंत ऑनलाईन नावनोंदणी करावी. परीक्षेबाबत अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.peraindia.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.