पुणे : राज्याच्या समाज कल्याण विभागातर्फे आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र,सध्या ऑफलाईन पध्दतीने स्वीकारले जात असल्यामुळे आंतरजातील विवाह योजनेचा लाभ मिळण्यास विलंब होत आहे.त्यामुळे समाज कल्याण विभागाने या योजनेसाठी ऑनलाईन स्वरुपातील अर्ज स्वीकारण्याचा निर्णय घेतला असून येत्या महिन्याभरात ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देले जाणार आहेत. समाज कल्याण विभागातर्फे गेल्या काही वर्षांपासून आंतरजातील विवाह करणाऱ्या दाम्पत्याला रोख रक्कम दिले जाते. अनुसुचित जातीतील मुलाने इतर दुस-या जातीतील मुलाशी किंवा मुलीने इतर जातीतील मुलाशी विवाह केल्यास शासनाकडून अनुदान म्हणून रोख रक्कम दिली जाते.गेल्या काही वर्षात या रक्कमेत टप्प्या-टप्प्याने वाढ करण्यात आली असून सध्या आंतरजातील विवाह करणाऱ्या दामपत्त्याला 50 हजार रुपये दिले जातात. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केल्यानंतर संबंधित दामपत्त्याला जिल्हा परिषदेतील समाज कल्याण कार्यालयाकडे फेऱ्या माराव्या लागतात. तसेच या योजनेसाठी दाखल केलेला अर्ज एकाच गोष्टीसाठी तीन अधिकाऱ्यांकडे जातो. परिणामी दामपत्त्याला योजनेचा लाभ मिळण्यास विलंब होतो. त्यामुळेच समाज कल्याण विभागाने ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.पुणे विभागीय समाज कल्याण विभाग कार्यालयाकडे आंतरजातील विवाह योजनेचा लाभ घेण्यासाठी वर्षभरात सुमारे एक हजार दांपत्यचे अर्ज येतात.रक्कम मिळण्यास विलंब होत असल्यामुळे काही दाम्पत्य अर्ज करणे टाळतात. मात्र,समाज कल्याण विभागाने त्यावर मार्ग काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.-----------आंतरजातील विवाह करणा दामपत्त्याला लवकरात लवकर शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी समाज कल्याण विभागातर्फे ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहेत.सध्या याबाबतचे काम सुरू असून पुढील महिन्यापासून ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारले जातील.कागदपत्रांची तपासणी करून लाभधारकाच्या थेट बँक खात्यात रक्कम जमा केली जाईल.एकाच व्यक्तीने दोन वेळा योजनेचा लाभ घेऊ नये, यासाठी लाभधारकाचा आधार क्रमांक घेण्यात येईल.- अविनाश देवसटवार,उपायुक्त, समाज कल्याण प्रादेशिक कार्यालय,पुणे.
आंतरजातीय विवाह योजनेसाठी ऑनलाईन अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2019 7:27 PM