पिंपरी : मावळ लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची जय्यत तयारी सुरू असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने मतमोजणी केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. बालेवाडीतील क्रीडासंकुलात १६ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या कालावधीत मतमोजणी केंद्राच्या ठिकाणापासून दोनशे मीटर परिसरात जमावबंदी, मोबाईल फोन, कॉडलेस फोन, व्हिडीओ कॅमेरा, संबंधित पक्षांच्या चिन्हाचे प्रदर्शन, स्फोटक अथवा घातक पदार्थ नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. १६ मे रोजी सकाळी सहा ते रात्री बारापर्यंत बालेवाडी क्रीडासंकुलातील स्ट्रॉँगरूमच्या दोनशे मीटर परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले असल्याचे जिल्हा दंडाधिकार्यांनी जाहीर केले आहे. निवडणूक कामासाठी नेमणूक केलेले अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि निवडणूक कामासाठी वापरण्यात येणार्या वाहनांसाठी हा प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार नाही. विजयी उमेदवारांच्या मिरवणुकीवर निवडणूक विभागाच्या कॅमेर्यांचे लक्ष आहे. विजयी उमेदवाराच्या समर्थकांकडून काढण्यात येणार्या मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी १७ कॅमेरे लावण्यात आले आहेत. मिरवणुकीसाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचा, खर्चाचा हिशेब हा उमेदवाराच्या खर्चात लावण्यात येणार आहे. व्हिडिओ चित्रीकरण पथक, व्हिडिओ पाहणी पथक नेमण्यात आले असून विशेष अधिकार्यांच्या नेमणुका केल्या आहेत, अशी माहिती निवडणूक विभागाने दिली. (प्रतिनिधी)
मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
By admin | Published: May 13, 2014 2:25 AM