पुणे: आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी कसबा विधानसभा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पोटनिवडणूक येत्या २६ फेब्रुवारीला रोजी पार पडणार आहे.ही निवडणूक चुरशीची होणार असून सर्व पक्ष निवडणुकीसाठी कंबर कसून प्रयत्न करणार आहेत. कसबा हा भाजपचा बालेकिल्ला असल्याने त्यांनीही जिंकण्याचा निर्धार केला आहे. अशातच तब्बल ५ वेळा कसब्यातून आमदारकी जिंकणारे गिरीश बापट आता आजारपणातही प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. थोडी ताकद लावा मी बरा होऊन परत येईल, विजयी झाल्यावर पेढे भरवायला मीच येईल असा विश्वास त्यांनी केसरीवाडा येथे व्यक्त केला आहे.
बापट म्हणाले, १९६८ नंतर मी पहिल्यांदा निवडणुकीत सक्रिय नाही. अनेक निवडणुका आपला पक्ष लढला अनेक वेळा जिंकू अनेक वेळा हरलो पण पक्ष संघटन राहिले. ही निवडणूक चुरशची नाही, ही निवडणूक आपण चांगल्या मताने जिंकणार आहोत. कार्यकर्त्यांनी चांगलं काम करा, कार्यकर्ता पक्षाचा आत्मा आहे. मी गेली अनेक वर्ष त्या आत्म्याची सेवा करण्यात धन्य मानल आहे. आपला उमेदवार नक्की जिंकून येणार आहे. हेमंत चे काम चांगले आहे थोडे नागरिकांपर्यंत पोहचण्याची गरज आहे. थोडी ताकद लावा मी बरा होऊन परत येईल, विजयी झाल्यावर पेढे भरवायला मीच येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान १९९२ च्या पोटनिवडणुकीत गिरीश बापट यांचा पराभव झाला होता. काँग्रेसकडून माजी महापौर वसंत थोरात व भाजपकडून गिरीश बापट यांच्यात लढत झाली. त्यामुळे थोरात यांनी बापट यांचा पराभव केला. काँग्रेसला मिळालेला या मतदारसंघातील तो पहिलाच विजय होता. आता तोच इतिहास पुन्हा घडणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे भाजपने कंबर कसून निवडणूक लढविण्याचे ठरवले आहे. भाजपकडून हेमंत रासने आणि महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांचा जोरदार प्रचार सुरु आहे.
कालच देवेंद्र फडणवीस यांनी घेतली बापटांची भेट
गिरीश बापट आमचे नेते आहेत. त्यांना भेटण्यासाठी यापूर्वी अनेकदा मी आलो होतो. आजही त्यांची भेट घेतली आहे. मागील वेळेस पेक्षा यावेळेस त्यांची प्रकृती चांगली आहे आणि याचा मला जास्त आनंद आहे. कसबा विधानसभा निवडणुकीची त्यांनाही काळजी आहे. या निवडणुकीत संदर्भात त्यांनी मला आज काही सूचना दिल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि गिरीश बापट यांचे कुटुंबीय या निवडणुकीच्या कामासाठी लागले आहेत. आजारी असतानाही कसबा निवडणूकीकडे त्यांचे बारकाईने लक्ष आहे. कसबा आणि चिंचवड या दोन्हीही ठिकाणी भारतीय जनता पार्टी नीटपणे निवडून येईल असा आत्मविश्वास देखील फडणवीस यांनी बोलून दाखवला होता.