पुणे : तौक्ते चक्रीवादळाचा फटका पुणे जिल्ह्यालाही बसण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त केले आहेत. गतवर्षी आलेल्या चक्रीवादळाचा अनुभव लक्षात घेऊन सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.
आपत्ती व्यवस्थान कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये पुणे जिल्ह्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे. पुणे जिल्ह्यात रविवार ते मंगळवार दरम्यान तौक्ते चक्रीवादळ येत असल्याबाबत भारतीय हवामान विभागाने इशारा दिला आहे. सदर कालावधीत वाऱ्याचा वेग ७०-८० किमी असू शकताे व या कालाधीत डोंगर माध्यावर व काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ताैक्ते चक्रीवादळाच्या अनुषंगाने संभाव्य उपाययोजना, वित्त व जीवितहानीच्या अनुषंगाने प्रतिसाद देण्यासाठी अधिकारी यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. त्यानुसार देशमुख यांनी चक्रीवादळाची पूर्वतयारी व उपाययोजनांची पूर्वतयारी व तत्काळ प्रतिसादासाठीच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, पुणे यांचे सनियंत्रणाखाली खालीलप्रमाणे अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. नमूद अधिकारी यांनी आवश्यक बाबींची पूर्तता करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हा नियंत्रण कक्षास वेळोवळी सादर करावा. खालील नमूद अधिकारी यांनी सर्व संबंधित विभागांशी संपर्क व समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करावी.